राज्यात येत्या पाच वर्षांत 26 वन उद्याने उभारण्यात येणार आहेत. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि पुण्यात दोन ठिकाणी ही वन उद्याने उभारण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. शहरांची फुप्फुसे म्हणून ओळखली जाणारी ही वन उद्याने देशात 200 ठिकाणी उभारण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. त्यासाठी 80 टक्के केंद्राचा, तर उरलेला 20 टक्के निधी राज्य सरकारला उभा करावा लागणार आहे. टप्प्याटप्प्याने हा निधी दिला जाणार असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच उद्यानांना केंद्राकडून मदत मिळणार आहे. 20 हेक्टरपेक्षा अधिक जमीन हा निकष यासाठी निश्चित करण्यात आला आहे. शहरांची फुप्फुसे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वन उद्यानाचे सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक, खेळण्याची व बसण्याची जागा अशा टप्प्यांत हे सुशोभीकरण करायचे आहे.
नागपुरात अंबाझारी, यवतमाळमध्ये वडगाव, पुण्यात पर्वती व वारजे तर चंद्रपुरात ही वन उद्याने साकारली जाणार आहेत. मुंबईसारख्या शहरांत जागा शिल्लक राहिली नसल्याने आजूबाजूच्या परिसरात वन उद्यानांचे नियोजन आधीपासून करण्यासाठी राज्य सरकारच्या वन विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. एका उद्यानासाठी दोन कोटी रुपये असा निधी मिळणार असून, राज्यांमध्ये अधिकाधिक वन उद्याने तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.