शहर परिसरातील प्रत्येक गल्लीत तसेच चौकात मोकाट व पिसाळलेल्या श्वानांनी हैदोस घातला आहे. हे श्वान लहान मुलांच्या अंगावर धाव करू पाहत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट व पिसाळलेलया श्वानांचा न.प. प्रशासनातील आरोग्य व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासियांची आहे.
लहान मुलांच्या शरीराचे लचके तोडण्यासोबतच अनेकांना वाचा हे मोकाट श्वान सध्या घेत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वारंवार तक्रारी देवून सुद्धा न.प. प्रशासनाला जाग येत नसल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाबद्दल रोष निर्माण होत आहे. पिसाळलेल्या व मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी येथील काही सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. त्यांच्याकडून पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्याची रणनिती आखली जात आहे.
देवळीकर सध्या मोकाट व पिसाळलेल्या श्वानांमुळे भीतीग्रस्त आहेत. आठवड्या भरात मोकाट श्वानांनी अनेकांना चावा घेतल्याचे बोलले जात असून त्यात लहान मुलांची सख्या सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. आदमणे पुºयातील पाटणकर यांच्या लहान मुलाच्या गालाचे अक्षरश: लचके तोडल्यामुळे या परिसरातील पालकांमध्ये श्वानांच्या हैदोसाबाबत कमालीची दहशत आहे. त्याचप्रमाणे येथील मटन मार्केट परिसरात अनेकांना मोकाट श्वानांनी चावा घेतल्याची बरीच उदाहरणे आहेत. एकूणच मोकाट व पिसाळलेल्या श्वानामुळे शहरातील रहिवाशांच्या अडचणीत भर पडली असून येथील शासकीय रुग्णालयात श्वानाने चावा घेतल्यानंतर देण्यात येणारी लसच उपलब्ध राहत नसल्याने अनेकांना खासगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. श्वानाने चावा घेतल्यावर रॅबीज नामक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्याला कुणाला श्वानाने चावा घेतला किंवा ओरबडले अशा रुग्णाने २४ तासाच्या आत वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्याने औषधोउपचार घेणे क्रमप्राप्त आहे. रॅबीज या आजारावर कुठलाही उपचार नसून केवळ प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता व नागरिकांची समस्या लक्षात घेता नगर परिषद प्रशासनाने वेळीच योग्य पाऊल उचलण्याची मागणी शहरातील सुजान नागरिकांची आहे.
दुर्लक्ष करण्यातच मानली जातेय धन्यता
शहरात सध्या मोकाट व पिसाळलेल्या श्वानांनी हैदोस घातला आहे. परंतु, पालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी माहिती देऊनही त्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानत असल्याची ओरड परिसरात आहे.