जेसीबी पळविणाऱ्या चोरट्याला पुलगाव पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून जेसीबीसह १२ लाखांचा माल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली.
९ जून रोजी मौजा रोहणा येथून जेसीबी कपंनीचा जेसीबी क्र. एमएच २९ व्ही ३९५७ हा मालक विजय टिकाराम उरकुडे (५४) रा. यवतमाळ यांच्याकडे कामावर असलेल्या हेल्पर मनीष दिलीप उईके (२९) रा. शिवाजी वॉर्ड आर्वी याने लबाडीने चोरून नेला. याबाबत उरकुडे यांनी पुलगाव पोलीस ठाण्यात १२ जून रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरविली.
पोलीस निरीक्षक एम.पी. बुराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अशोक भोयर, अनिल भोवरे आणि तपास पथकाने तपासचक्र फिरवून आरोपी मनीष दिलीप उईके रा. शिवाजी वॉर्ड आर्वी याला नागपूर येथून ताब्यात घेतले. शिवाय त्याने चोरी केलेला जेसीबी क्र. एमएच २९ व्ही ३९५७ किंमत १२ लाख रुपये बुट्टीबोरी शिवारातून हस्तगत केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे, जमादार अशोक भोयर, विवेक बन्सोड, पोलीस शिपाई अनिल भोवरे, विकास मुंडे, मुकेश वांदिले, राहुल साठे आदींनी केली.पुलगाव पोलिसांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच जेसीबी आणि चोरटा शोधून काढल्याने मालकाला दिलासा मिळाला आहे.