यशोदा नदीच्या खोलीकरणामुळे नदी पलीकडे शेती असणाऱ्या दिघी (बोपापूर) येथील शेतकऱ्यांसह मजुरांची अडचण निर्माण झाली आहे. नदीच्या पात्रात कधी कंबरेपर्यंत तर कधी छातीपर्यंत पाणी रहात असल्याने पलीकडे जावून शेती कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढण्याकरिता नदीवर कोल्हापुरी बंधारा निर्माण करून गावकऱ्यांच्या रस्त्याची समस्या मार्गी काढावी अशी मागणी सरपंच घनश्याम कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दिघी (बोपापूर) येथील यशोदा नदीच्या खोलीकरणामुळे पात्रातील भूभाग खोल गेल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. या पात्रात कधी कंबरेपर्यंत तर कधी छातीपर्यंत पाणी राहत असल्याने नदी ओलांडून पलीकडे जाणे जीवावर बेतणारे ठरले आहे. त्यामुळे नदीपलीकडे असणारी शेती कशी करावी या विवंचनेत या भागातील शेतकरी आहेत.
खोलीकरणामुळे शेताकडे जाणारे पूर्ण रस्ते बंद झाले आहे. गावाला लागून बजाज फाऊंडेशनच्यावतीने नदीच्या पात्रात मातीकाम करून तात्पुरती रस्ता केला आहे. परंतु हा रस्ता सुद्धा वाहून गेल्याने पात्रात दलदल निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांना शेती करावयाची असल्यास जवळच असलेल्या नदीच्या पुलावरून आठ किमी जाणे व येणे असा १६ किमीचा फेरा पडत आहे. नदी खोलीकरणामुळे शेतीला पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याठिकाणी कोल्हापुरी बंधारा बाधून जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी गावकºयांनी केली आहे.