महावितरणचा अभिनव उपक्रम ‘पॉवर ऑन व्हील’
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर शहरातील महावितरणच्या वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळण्यासाठी ‘पॉवर ऑन व्हील’ ची अभिनव सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एखाद्या भागातील वितरण रोहीत्र नादुरुस्त झाल्यास, तो रोहीत्र दुरुस्ती किंवा बदली करण्याच्या कालावधीत तेथील वीज ग्राहकांना अंधारात राहावे लागू नये यासाठी महावितरणने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

रोहित्र नादुरुस्त झाल्यावर त्याच्या दुरुस्ती किंवा बदलण्यासाठी साधारणपणे ३-४ तासाचा कालावधी लागतो. या काळात वीज ग्राहकांना वीजेसिवाय लागू नये यासाठी ‘पॉवर ऑन व्हील’ सोबतीला असल्याने रोहित्र बदलायचे काम सुरु असतांना ‘पॉवर ऑन व्हील’ च्या माध्यमातून ग्राहकांना वीज पुरवठा सुरु राहत असल्याने शहरातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून या सुविधेमुळे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाणही कमी झाले आहे. राज्याचे ऊर्जा, नवीन व नीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नेहमीच वीज ग्राहकांना अखंडित आणि शाश्वत वीजपुरवठ्यासाठी आग्रही असतात, या अनुषंगाने पावसाळ्याच्या दिवसात वाढणा-या रोहीत्र नादुरुस्त होण्याच्या प्रमाणाचा फ़टका सर्वसामान्य वीज ग्राहकांना अधिक वेळ पडू नये यासाठी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी ‘पॉवर ऑन व्हील’ चा उपक्रम राबविण्याबाबत केलेल्या सुचनेच्या अनुषंगाने नागपूर प्रविभागाचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या पुढाकाराने महावितरणच्या कॉग्रेसनगर विभागात ‘पॉवर ऑन व्हील’ चा उपक्रम यशस्वीरित्या सुरु झाल्याची माहीती, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिली असून विदर्भातील सर्व प्रमुख शहरांतून हा उपक्रम राबविण्याची तयारी महावितरणकडून करण्यात येत आहे.