नोंदणी पद्धतीने विवाह झाल्यानंतर पतीच्या आजीच्या तेरवी कार्यक्रमादरम्यान पळून गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या मुलासोबत वर्धेतील श्रीराम शिवमंदिरात शुक्रवारी विवाह पार पडणार होता. रितीरिवाजाने लग्नसोहळा आटोपत नवदाम्पत्याच्या डोक्यावर वऱ्हाड्यांनी अक्षदा टाकल्या; पण त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत दामिनी पथकाने विवाह मंडपात येत नवदाम्पत्याला ताब्यात घेऊन शहर पोलीस कचेरीत नेले. या प्रकरणी तरूणीच्या पहिल्या पतीच्या तक्रारीवरून नवदाम्पत्याविरूद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, उमेश रामदास भांडेकर रा. जामणी हा ग्रा.पं. कार्यालयात संगणक परिचारक म्हणून कार्यरत आहे. मार्च महिन्यात उमेशचा विवाह नागपूर जिल्ह्यातील बिबी (सावळी) येथील रहिवासी असलेल्या त्याच्या सख्ख्या मामेबहिणीसोबत नोंदणी पद्धतीने पार पडला. यानंतर उमेशच्या आजीचे निधन झाल्याने उमेशची पत्नी वगळता पत्नीकडील कुटुंबीय जामणी येथे तेरवीच्या कार्यक्रमाला आले होते. दरम्यान, उमेशच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत पलायन केले. तेव्हापासून उमेश व त्याची पत्नी यांच्यात कुठलाही संवाद झाला नाही; पण तिने फेसबुकवर टाकलेल्या एका मजकुरावरून उमेशला त्याची पत्नी दुसरे लग्न करीत असल्याचे निदर्शनास आले. सदर लग्न सोहळा वर्धेतच होत असल्याचे लक्षात येताच त्याने थेट पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देत योग्य कारवाई करा, अन्यथा मी माझ्या जीवाचे बरेवाईट करेल, असे सांगितले. यानंतर आपला मोबाईल बंद केला. यावरून दामिणी पथकाच्या काळे यांनी आपल्या पथकासह सदर युवकाचा शोध घेत लग्नमंडपात धडक दिली. तेथे आनंदात असलेल्या नवदाम्पत्याला पथकातील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणले.
पूर्वीच्या पतीकडून घटस्पोट न घेता हा विवाह होत असल्याने पोलिसांनी उमेशच्या तक्रारीवरून दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या उमेशच्या पत्नीसह तिच्याशी लग्न करणाऱ्या गांधीनगर येथील राहूल कुनवटकर याच्याविरुद्ध कलम ४९४, ४९५, ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पळून गेल्यानंतर केळझर येथे उरकला विवाह
दुसºयांदा लग्न करणाऱ्या उमेशच्या पत्नीने तेरवीच्या कार्यक्रमादरम्यान माहेरून पळ काढल्यानंतर राहूल कुनघटकर याच्याशी केळझर येथे ६ जून रोजी लग्न केले. यानंतर आज रितीरिवाजाने लग्न सोहळ्याचे आयोजन शहरातील श्रीराम शिवमंदिरात केले होते, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पूढे आले आहे.
उमेश व राहूल यांच्यासह तरुणीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. शिवाय विचारपूस केली जात आहे. चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल.
- चंद्रकांत मदणे, ठाणेदार, शहर पोलीस स्टेशन, वर्धा.
समाजात महिला व पुरुषांमध्ये कायद्याचा वचक नाही. आजची ही घटना कायद्याचा गैरवापर करणारीच ठरत आहे.
- अनिता ठाकरे, कायदे तज्ज्ञ, वर्धा.
मामेभावालाच दिला दगा
उमेशचे ज्या मुलीसोबत लग्न झाले, ती त्याची सख्खी मामेबहीण आहे; पण ती पळून गेल्याने त्याच्याही अडचणीत भर पडली होती. तिने आपल्या मामेभावालाच दगा दिल्याचे या प्रकरणात पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.