पावसाळी अधिवेशनातील
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची पूर्वतयारी
चंद्रपूर /प्रतिनिधी:
नागपूर येथे होणाऱ्या पावसाळी अधिवेशनादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसोबतच्या संभाव्य बैठकीला लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीची आज उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये गेल्या बैठकीत झालेल्या विषयाच्या पूर्ततेबाबत आढावा घेण्यात आला.
नागपूर येथे 4 जुलै पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध प्रश्नावर बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. या बैठकीत येणाऱ्या संभाव्य प्रश्नांबाबत व जिल्ह्यातील प्रमुख समस्यांबाबत आढावा घेणारी एक बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील विविध विभागाच्या प्रलंबित कामाचा आढावा बैठकीमध्ये घेतला. यामध्ये जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प, अर्धवट राहिलेले प्रकल्प, बांधकाम उपयोजना याबाबत विचार विनिमय करण्यात आला. कोणत्या विभागाकडे कुठले प्रस्ताव प्रलंबित आहे. याचा देखील पाठपुरावा करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी या बैठकीत दिले. याशिवाय पालकमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार व जिल्ह्यातील विविध विभागांनी मागणी केलेल्या काही नव्या प्रस्तावाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिवदास यासह पाणीपुरवठा, जलसंपदा, बांधकाम, ग्राम विकास, रोजगार हमी योजना, कृषी, जिल्हा आरोग्य यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.