चंद्रपूर/प्रतिनिधी:
शासनाने बँकांच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्जमाफीचा निधी जमा केला आहे. मात्र असे असताना देखील अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी खरीप पिक कर्ज देताना गती दिली जात नाही. त्यामुळे पात्र असणारे शेतकरी, पहिल्यांदाच कर्ज घेणारे शेतकरी व अन्य शेतकऱ्यांना अडवणूक करणाऱ्या बँकांवर सक्त कारवाई करण्यात येईल, अशी तंबी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिली.
जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्जमाफीनंतर मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत असताना बँकांना त्यांचा पैसा मिळाला आहे. मात्र या मोसमात विनाविलंब सुलभतेने शेतकऱ्याला कर्ज मिळावे, यासाठी शासन पुढाकार घेत असताना काही बँका या मोहीमेला गती देत नसल्याचे दिसून आले आहे. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल. आपल्या बँकेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या शेकडो खात्यात मोठया प्रमाणात पैसा जमा आहे. त्या खात्यांना बंद करून ज्या बँका सहकार्य करणार त्या बँकेच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येईल, असा सज्जड दम आजच्या बैठकीत ना.हंसराज अहिर यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला. या बैठकीला आमदार ॲड.संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा यांच्यासह खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आमदार ॲड.धोटे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी जिल्हाभरातून आलेल्या तक्रारीबाबत त्यांच्या प्रतिनिधींना अवगत केले. बँका आणि जिल्हा बँका यांच्यातील समन्वय नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. बँक निहाय कर्जवाटपाचा आढावा यावेळी नामदार अहिर यांनी घेतला. काही राष्ट्रीयकृत बँकांनी या मोहिमेमध्ये अतिशय अत्यल्प असे कर्ज वाटप केल्याचे लक्षात आले. यासंदर्भात बैठकीमध्ये विचारणा केली असता ॲक्सिस बँक, अलाहाबाद बँक, बडोदा बँक,सिंडिकेट बँक आधी बँकांमध्ये अतिशय कमी प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज वितरण केले असल्याचे दिसून आले. या बँकांनी कर्ज वितरणामध्ये स्वतःला झोकून न दिल्यास गंभीर परिणाम होतील असा इशाराही नामदार अहिर यांनी यावेळी दिला. जिल्हा सहकारी बँकेमध्ये कर्ज वाटप करत असतानाच्या काही जाचक अटीबाबत या बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ देताना मध्ये येणाऱ्या कायद्यांना तातडीने बदलण्याबाबत अहिर यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार धोटे यांनी राजूरा मतदारसंघातील जिवती, कवठाळा व पाटण या अनेक गावांमध्ये बँक सहकार्य करत नसल्याचा थेट आरोप केला. अशा बॅंकांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी बँकेमध्ये जमा झालेला रकमा आणि या वर्षी शेतकऱ्यांना देण्याचे कर्ज याबाबतीत बँकांनी ताळमेळ लावावा व आत्मपरीक्षण करीत शेतकऱ्यांसाठी पुढे यावे, असे आवाहन केले. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा यांनी यावेळी प्रत्येक बँकेच्या या मोहिमेतील सहभागाबाबतची माहिती दिली. जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी आत्तापर्यंत वाटप करण्यात आलेल्या कर्जाबाबत माहिती दिली. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 50 हजार पात्र शेतकऱ्यांना 337 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा बँकेने 55% वाटा उचलला आहे.
आज प्रत्येक
बँकेत कर्ज मेळावा
राज्य शासनाच्या
निर्देशाप्रमाणे उद्या दिनांक 26 जून रोजी खरीप पिक कर्ज वाटपासाठी प्रत्येक बँकेमध्ये
मेळावा घेण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मध्ये
ज्यांना कर्ज माफ करण्यात आले आहे. अशा खातेधारकांना पुढील वर्षासाठी खरीप पिक
कर्ज उपलब्ध केले जाणार आहे. सर्व बँकांमध्ये आयोजित होणाऱ्या या मेळाव्यामध्ये
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही ना.अहिर यांनी केले आहे. उद्याच्या
मेळाव्यामध्ये प्रत्येक बँकेने आपल्या अधिक क्षमतेने काम करत शेतकऱ्यांना न्याय
द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
|