गडचिरोली/प्रतिनिधी:
तंबाखू न दिल्यानं नातवानं आजोबाची हत्या केल्याची संतापजनक घटना गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात घडली आहे. सोमनपल्ली गावात नातवानं तंबाखू देण्यास नकार दिल्यानं आजोबाची कुऱ्हाडीनं वार करत निर्घृण हत्या केली.
राजम तलांडी असं आजोबाचं नाव आहे. आरोपी नातू सुभाष तलांडी याला पोलिसांनी अटक केली आहे. गडचिरोलीत तंबाखू सेवनाबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येतीये. डॉ. अभय बंग यांच्या नेतृत्वात व्यसनमुक्तीसाठी अभियानही राबवले जातात. मात्र तहीही व्यसनाचं प्रमाण काही कमी होत नाही आहे.तलांडी कुटुंबातील २७ वर्षीय मुलाने आपल्या ७० वर्षाच्या राजम तलांडी नामक आजोबाची निर्घृण हत्या केली. केवळ तंबाखू सेवनाची सवय असलेल्या नातवाने आजोबांकडे त्याची मागणी केली. आजोबाने ती नाकारली. रागाने पिसळलेल्या आरोपी नातवाने घरातून कुऱ्हाड आणून आजोबावर वार केले. आणि त्यांचा जीव घेतला.
गडचिरोली जिल्हा तंबाखू आणि खर्रा या २ व्यसनांच्या विळख्यात अडकला असल्याची माहिती विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुढे आली होती. मुखाचा आणि इतर कर्करोगाचे जिल्ह्यातील वाढते प्रमाण नेमके हेच दर्शवीत होते. आपल्या आसपासच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी काम करणा-या धानोरा तालुक्यातील डॉ. बंग दाम्पत्याच्या शोधग्राम प्रकल्पात याची सविस्तर नोंद घेण्यात आली. आणि येथेच तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनातून जिल्ह्याला मुक्त करण्यासाठी 'मुक्तिपथ' अभियानाची मुहूर्तमेढ रोवली गेली.मुक्तिपथच्या सामाजिक आणि आरोग्यविषयक सर्वेक्षणात जिल्ह्यातील लाखो नागरिक तंबाखूच्या विळख्यात अडकले असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. 'खर्रा' हा या भागात सुपारीत चुना-सुगंधित तंबाखू मिसळून घोटून तयार केला जाणारा लोकप्रिय पदार्थ.