आठ रस्ता चौक ते ऑरेंज सिटी चौक मार्गाचा केला दौरा
शहरातील फुटपाथ पादचाऱ्यांसाठीच आहे. त्यावर एकही अतिक्रमण नको. फुटपाथवरील अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, असे निर्देश नागपूर महानगरपालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. मंगळवारी (ता.१९) आयुक्तांनी लक्ष्मीनगर येथील आठ रस्ता चौक ते ऑरेंज सिटी चौक या मार्गाची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, लक्ष्मीनगर झोनचे उपअभियंता रवींद्र मुळे, श्री. कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते. लक्ष्मीनगर येथील आठ रस्ता चौक ते ऑरेंज सिटी चौक या मार्गावरील फुटपाथवर इमारतीच्या पायऱ्या आहेत किंवा अन्य बांधकाम केलेले आहे. ते बांधकाम तातडीने काढून टाकण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. फुटपाथवर खाद्यपदार्थांचे ठेले, फळविक्रेते, भाजीविक्रेते बसतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना त्रास होतो. हे सर्व ठेले तातडीने हटविण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. आरपीटीएस रोड वर असलेल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रालगत अनेक दुकानांचे अतिक्रमण आहे. त्यांना तातडीने अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीस देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. जेरील लॉन चौकातील कचरा कुंड भरलेले आहे. त्यातून कचरा बाहेर पडत असल्याचे दृश्य आयुक्तांनी बघितले. यानंतर अशी परिस्थिती दिसता कामा नये. झोनच्या सहायक आयुक्तांनी दररोज पाहणी दौरा करावा, अशी सूचनाही त्यांना केली. यानंतर आपण शहरातील सर्व फुटपाथचे निरिक्षण करणार आहोत. यानंतर फुटपाथवर अतिक्रमण आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यावेळी आयुक्तांनी दिला. वर्धा रोडवरील उरुवेला कॉलनी येथे नाल्याच्या काठावर अतिक्रमण आहे. ते अतिक्रमणही तातडीने हटविण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.