शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने विविधस्तरावर अभ्यास सुरू केला आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यातील बाबींची अंमलबजावणी करण्याबरोबरच घरी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंची कशा प्रकारे विल्हेवाट लावता येईल, यासाठी योजना आखण्याचे काम सध्या पालिका प्रशासन पातळीवर सुरू आहे. त्यामुळे लवकरच मनपातर्फे प्लास्टिक संकलन केंद्र सुरू होणार आहे.
व्यापारी संघांची बैठक सोमवारी मनपा सभागृहात आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. शंभर टक्के प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याची तयारी महानगरपालिकेने सुरू केली असून चंद्रपूरकरांना आपल्या घरातील प्लास्टिकची विल्हेवाट लावता यावी, यासाठी पालिकेच्या तिनही झोन कार्यालयांमधे प्लास्टिक संकलन केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
बहुतेक घरी प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, अन्य वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. नागरिक घरातील प्लास्टिक वस्तू या केंद्रावर जमा करू शकतात. तसेच शहरात प्लास्टिक वस्तू जमा करण्यास फिरते ‘कचरा संकलन वाहन’ सुरु करण्यात येणार आहे. जमा झालेल्या प्लास्टिक वस्तूंची मनपातर्फे शासन निर्देशाप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येईल. व्यापारी, नागरिकांनी संकलन केंद्र किंवा फिरते वाहन यात प्लास्टिक जमा करावे. तसे न केल्यास व साठा किंवा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. प्लास्टिकमुक्त मोहिमेस व्यापारी मंडळे व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शितल वाकडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन कापसे व सर्व क्षेत्रीय अधिकारी, स्वछता अधिकारी उपस्थित होते.

