गडचिरोली - गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेला नक्षल्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख रामन्ना उर्फ श्रीनिवासी मडरू हा शस्त्रास्त बनविण्यात पारंगत होता. त्याने नक्षल्यांच्या विविध दलममध्ये सेवा दिली आहे. त्यामुळे त्याची अटक हा नक्षल्यांसाठी मोठा हादरा आहे. दरम्यान रामन्नासह त्याची पत्नी पद्माला शनिवारी गडचिरोली जिल्हा न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गडचिरोलीसह आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेशात नक्षल चळवळीत सेवा देणा-या रामन्ना व पद्मा या दाम्पत्याला शुक्रवारी पहाटे गडचिरोली पोलिसांच्या सूचनेनंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारशहा रेल्वे स्थानकावर अटक झाली होती. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना दुपारी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
रामन्ना शस्त्रास्त्र बनविण्यात आणि ते चालविण्यात पारंगत होता. त्यामुळे त्याला अनेक दलममध्ये नक्षल्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पाठविण्यात आले होते. दंडकारण्य कमिटीशिवाय त्याने कोंडागाव, माल, टिपागड, अहेरी आणि बस्तरच्या जंगलात नक्षल दलममध्ये सेवा दिली आहे. त्यामुळे शासनाने त्याच्यावर २५ लाख रुपयांचे इनाम ठेवले होते. रामन्नाची अटक पोलिसांसाठी मोठे यश आहे. त्याच्या माध्यमातून नक्षल्यांच्या हालचाली आणि त्यांच्याकडील शस्त्रांबद्दलची माहिती मिळू शकते.
अनेक चकमकीत पद्माचा सहभागरामन्नासोबत अटक झालेली त्याची पत्नी पद्मा कोडापे ही १९९२ मध्ये नक्षल चळवळीत सक्रिय झाली. ती टिपागड दलममध्ये कार्यरत होती. धानोरा तालुक्यातील चकमक, २२ मार्च १९९६ ला मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याच्या डेरीमुरम जंगलातील चकमक, २२ एप्रिल १९९६ ची सिंदेगाव चकमक, १९९८-९९ मधील बस्तर जिल्ह्यातील सिरीवेरामध्ये झालेली चकमक आदींमध्ये तिचा सहभाग होता. तिच्यावर शासनाने ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.