- भरतवाडा, पुनापूर परिसरातील नागरिकांना दिली
- नगर विकास आराखड्याची माहिती : नागरिकांनीही केल्या सूचना
- नागपूर, ता. ८ : नागपूर शहराचा ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत विकास करण्यासाठी निवड झाल्यानंतर पूर्व नागपुरातील भरतवाडा, पुनापूर, पारडी, भांडेवाडी अंतर्गत येणाऱ्या १७३० एकर क्षेत्रात नगर रचना परियोजना राबविण्याचे कार्य नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासाठी या संपूर्ण प्रकल्पात नागरिकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले.
क्षेत्राधिष्ठीत नियोजनबद्ध व शाश्वत विकासासाठी निवड करण्यात आलेल्या भरतवाडा, पुनापूर, पारडी, भांडेवाडी येथे नगर रचना परियोजना राबविण्यात येत आहे. अहमदाबाद येथील एचसीपी कंपनीने सदर परियोजना तयार केली असून त्याबद्दल परिसरातील नागरिकांना माहिती देण्यासाठी पुनापूर येथील भवानी मंदिर सभागृहात नगर रचना परियोजनेतील प्रस्तावित तरतुदींबाबत जमीन मालकांसोबत विचारविनीमय सभेचे आयोजन गुरुवारी (ता. ८) करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, नगरसेवक बाल्या बोरकर, धम्मपाल मेश्राम, प्रदीप पोहाणे स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, एचसीपीचे गणेश अहिरे उपस्थित होते.
आयुक्त अश्विन मुदगल पुढे म्हणाले, शहराचा नियोजनबद्ध विकास नसल्यामुळे प्रत्येकाला अडचण सहन करावी लागते. नागरी सुविधांचा अभाव असतो. मग अशा शहराचा शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास करायचा असेल तर लोकसहभाग महत्त्वाचा असतो. लोकांचा सहभाग, शासनाचा निधी आणि प्रशासनाचे कार्य यातून ‘स्मार्ट सिटी’ संकल्पना साकार होईल. यासाठी निवड करण्यात आलेल्या १७३० एकर जागेचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी नगर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी नागरिकांच्या सूचना आमंत्रित असून आपल्या सहभागानेच या आराखड्याला अंतिम रूप द्यायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
आमदार कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपुरात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती आपल्या मार्गदर्शनातून दिली. ते म्हणाले, सध्या सर्वाधिक विकास कामे पूर्व नागपुरात सुरू आहे. सिम्बॉयसिस सारखे विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल पूर्व नागपुरात येत आहे. उड्डाण पुलाची कामे प्रगतीपथावर आहेत. आता एरिया बेस्ड डेव्हलपमेंटच्या माध्यमातून भरतवाडा, पुनापूर, पारडी भागाचा नियोजनबद्ध विकास प्रस्तावित आहे. पुढील टप्प्यात वाठोडा, भांडेवाडी हे क्षेत्रही या प्रकल्पात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
लकडगंज झोनचे सभापती यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. पूर्व नागपूरमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेल्या नियोजनबद्ध विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्यांनी आभार मानले. विकासाच्या प्रत्येक योजनेत या भागातील नागरिक सहकार्य करतील, असे आश्वासन दिले.
तत्पूर्वी स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी सभा आयोजनामागील भूमिका विषद केली. एरिया बेस्ड डेव्हलपमेंटबाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर नगर विकास आराखड्याचे प्रारूप तयार करणाऱ्या एचसीपी कंपनीचे गणेश अहिरे यांनी पारडी, भरतवाडा, पुनापूरसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याबाबत माहिती दिली. सभेला नगरसेविका मनिषा कोठे, अभिरूची राजगिरे, समिता चकोले, वैशाली वैश्य, वंदना भुरे, मनिषा धावडे, जयश्री रारोकर, मनिषा अतकरे, सरीता कावरे, अनिल गेंडरे उपस्थित होते. भवानी देवस्थानच्या विश्वस्त मेहर यांच्या आई चंद्रभागाबाई मेहर यांच्या निधनानिमित्त सभेत शोक व्यक्त करून त्यांना मौन श्रद्धांजली यावेळी वाहण्यात आली.
नागरिकांनी केल्या सूचना
नगर विकास आराखड्याबाबत माहिती जाणून घेतल्यानंतर सभेला उपस्थित जमीन मालकांनी आपल्या सूचना अधिकाऱ्यांसमोर ठेवल्या. सूचना करणाऱ्या नागरिकांमध्ये सुदाम सहारे, ईश्वर जयस्वाल, रामप्रसाद रहांगडाले, राजेश्वर दिवटे, श्यामसुंदर शमार, जयंतीभाई पटेल, भागवतराव गुरव, हर्षवर्धन नागपुरे, ज्ञानेश्वर काळे, अशोक शिवारे, रमेश भारती, आशीष आष्टनकर, कृष्णा कामडी, अनिल कोडापे, अनिता खोरगडे, चक्रधर अतकरे आदींनी सूचना मांडल्या तर काहींनी विकास आराखड्याबाबत असलेले प्रश्न विचारले. डॉ. रामनाथ सोनवणे यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासाचा प्रकल्प परिसरात राबवित असल्याबद्दल नागरिकांनी आमदार आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले.
Thursday, February 08, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য