रामटेक नगर परिषदमध्ये वर्षभरापुर्वी नगराध्यक्ष व १३ नगरसेवक निवडून आल्याने भाजपाला एकहाती सत्ता प्राप्त झाली. मात्र, नगरपालिकेतील राजकारण वर्ष उलटल्याने अचानकच तापले. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. सरकारने जरी उपाध्यक्षांचा कार्यकाळ अडिच वर्षांचा ठरविला असला तरी प्रत्येक वर्षी एकेका नगरसेवकाला उपाध्यक्ष होण्याची संधी देण्याचे भाजपा गटात ठरले होते. मात्र, विद्यमान उपाध्यक्षा कविता मुलमुले यांनी कालावधी पूर्ण होवूनही राजीनामा न दिल्याने नगरपालीकेतील राजकारण तापल्याचे भाजपाच्या अंतर्गत सुत्राकडून माहिती मिळाली.
रामटेक नगरपालीकेत थेट जनतेतून भाजपाचे दिलीप देशमुख नगराध्यक्ष निवडून आले. त्यांचेसोबत नगरपालीकेत भाजपाचे १३ सदस्यही निवडून आले. भाजपाच्या नगरसेविका कविता मुलमुले यांची उपाध्यक्ष पदावर सर्व सदस्यांनी निवड केली. मात्र, असे करताना दरवर्षी उपाध्यक्षपदाची संधी अन्य नगरसेवकांना देण्याबाबत ठरविण्यात आले होते. यासाठी वर्ष संपताच उपाध्यक्षांनी आपला राजीनामा सादर करावा. या पदासाठी प्रशासन निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल व निवडणूकीच्या माध्यमातून उपाध्यक्षाची निवड केली जाईल असे ठरले होते. यावर विद्यमान उपाध्यक्षा कविता मुलमुले यांनीही होकार दिला होता. तसे राजीनामापत्र त्याचवेळी लिहून दिले होते. मात्र, आता त्या या पदाचा राजीनामा देण्यास तयार नसल्याचे वृत्त आहे.
उपाध्यक्षपदाची संधी आपल्याला मिळावी यासाठी वर्षभरापासून वाट बघणार्या नगरसेवकांचा यामुळे हिरमोड झाला आहे. याबाबत भाजपाचे पदाधिकारी व नगरसेवकांची सभा संपन्न झाली. मात्र, त्यात तोडगा न निघाल्याने सत्तापक्षाच्या सर्व नगरसेवकांनी शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) नागपुरला भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडल्याचे समजते.
यापुर्वी झालेल्या बैठकीत रामटेकचे आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा महामंत्री गजभिये, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास तोतडे यांनी सर्व नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या. सर्वच नगरसेवकांनी विद्यमान उपाध्यक्षांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा द्यावा. नवीन उपाध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा करावा, असे मत व्यक्त केल्याचे समजते. मात्र, या बैठकीला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व उपाध्यक्षा कविता मुलमुले यांचे पतीदेव संजय मुलमुले हे अनुपस्थित राहीले. भाजपातील या अंतर्कलहाची मात्र रामटेक शहरांत खमंग चर्चा आहे.