सावली प्रतिनिधी:
भाजपा सरकार केवळ घोषणाबाज आहे. आश्वासनांची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. उपरी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आयोजित शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार मेळाव्यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली जि.प. सदस्य अॅड. राम मेश्राम, माजी सभापती दिनेश चिटनुरवार, तालुका अध्यक्ष यशवंत बोरकुटे, महिला तालुकाध्यक्ष उषा भोयर, माजी उपसभापती राकेश गड्डमवार, सावलीच्या नगराध्यक्ष रजनी भडके, उपाध्यक्ष विलास यासलवार, विजय मुत्यालवार, पं.स. सदस्य विजय कोरेवार, भाष्कर गड्डमवार, विलास भांडेकर, शंकर बोदलकर, जि.प. सदस्य वैशाली शेरकी, सरपंच शिला म्हशाखेत्री आदी उपस्थित होते.
आ. वडेट्टीवार म्हणाले, भाजप सरकारने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदच्या १३०० शाळा बंद करून गरीब मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला आहे. कर्जमाफीच्या नावावर अनेक जाचक अटी लावून शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी दिली नाही.
जनतेच्या पैशाची केवळ उधळपट्टी केली जात आहे. कोरगाव भीमा येथे जातीय दंगली घडविणाऱ्या संभाजी भिडे व विनायक एकबोटे यांना अटक करण्याचे सोडून संरक्षण देण्याचे काम करीत आहे.जातीय तेढ निर्माण करणारे व शेतकरी, शेतमजूरविरोधी सरकार असल्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांनी जागा दाखवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्रीमंतावर मेहरबान आणि गरीबांवर अन्याय हेच सुरू असल्याची टीका त्यांनी मेळाव्यात केली. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आणून बारमाही सिंचनाची व्यवस्था केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यासाठी ३५० कोटींची निविदा मंजूर करण्याचे काम येत्या काही दिवसात होणार असल्याचेही आ. वडेट्टीवार यांनी नमूद केले. यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनीही विचार मांडले.
उपरी येथील सरपंच तथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आशिष मनबत्तुनवार आणि भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांनी दिले.
संचालन प्रविण गेडाम यांनी केले.आभार यशवंत बोरकुटे यांनी मानले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.