खामला येथे प्रस्तावित ३३/११ केव्ही जीआयएस उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर
नागपूर, दि. 17 फ़ेब्रुवारी 2018:-
दक्षिण-पश्चिम नागपुरातील वीज ग्राहकांना शाश्वत वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणने खामला येथे अद्ययावत जीआयेस तंत्रज्ञानावर आधारीत ३३/११ केव्ही उपकेंद्राचे काम प्रस्तावित केले असून येत्या एप्रिल पर्यंत हे उपकेंद्र सुरु करण्याचा मानस महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफ़ीक शेख यांनी व्यक्त केला आहे.
दक्षिण-पशिम नागपूरचा होत असलेला विकास बघता येथील भविष्यातील वीजेच्या मागणीचे नियोजन करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार महावितरणने केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजने अंतर्गत खामला येथे ३३/११ केव्ही उपकेंद्र प्रस्तावित केले होते. सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणा-या या उपकेंद्रामुळे सध्या त्रिमूर्तीनगर उपकेंद्रातून वीज पुरवठा होणा-या खामला, अग्ने लेआऊट, त्रिशरण नगर, शास्त्री लेआऊट, खामला सिंधी कॉलनी, टेलिकॉम नगर, सावरकर नगर, स्वावलंबी नगर, संचयनी कॉम्प्लेक्स, पन्नासे ले आऊट, एच.बी. इस्टेट, जयप्रकाश नगर, तपोवन कॉम्प्लेक्स, नरकेसरी लेआऊट, दीनदयाल नगर, सोनेगाव, भेंडे लेआऊट, रवींद्र नगर या परिसरातील सुमारे २२ हजार वीज ग्राहकांना योग्य दाबाने आणि अखंडित वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. वर्तमानात या परिसराला वीज पुरवठा करणारी ११ केव्ही वीज वाहिनीची लांबी अधिक असल्याने त्यात काही बिघाड झाल्यास ग्राहकांना बराच काळ अंधारात राहावे लागते. ग्राहकांची हि समस्या कायमस्वरुपी निकाली काढण्याचा सकारत्मक दृष्टीकोन ठेवित या उपकेंद्राचे उभारणी करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला होता. याशिवाय खामला उपकेंद्राच्या कार्यान्वयनानंतर वर्तमान त्रिमूर्तीनगर उपकेंद्रावरील वीजभार क्मी होऊन त्रिमुर्तीनगर, जयताळा, गोपालनगर, प्रसादनगर या भागातील ग्राहकांच्या वीजपुरवठ्याचा दर्जाही सुधारणार आहे.
महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफ़ीक शेख यांनी प्रस्तावित खामला उपकेंद्राला नुकतीच भेट देत सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला, हे उपकेंद्र येत्या एप्रिल पर्यंत सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या आवश्यक सुचनाही त्यांनी केल्या. यावेळी नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता मनिष वाठ, कॉग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे व इतर अधिकारी उपस्थित होते.
अद्ययावत जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर - नियोजित ३३/११ केव्ही खामला उपकेंद्रात अद्ययावत जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. याअनुषंगाने कमीत कमी देखभालीवर आधारित गॅस इन्सुलेटेड उपकेंद्र (जीआयएस) तंत्रज्ञानावर आधारीत उपकेंद्र खामला येथे उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. गॅस इन्सुलेडेड उपकेंद्रांमुळे कमीत कमी जागेत उपकेंद्रे उभारणे शक्य झाले आहे. आठशे चौरस मीटर एवढी जागा जीआयएस उपकेंद्रांसाठी लागते. या तुलनेत महावितरणमध्ये सध्या उभारण्यात येणाऱ्या आउटडोअर उपकेंद्रांसाठी चार हजार स्क्वेअर मीटर, तसेच इनडोअर उपकेंद्रांसाठी बाराशे चौरस मीटर जागा लागते. त्यामुळे शहरी भागात कमी जागेत जीआयएस उपकेंद्रे उभारणे शक्य झाले आहे. गॅस इन्सुलेटेड उपकेंद्राला शून्य देखरेख (झिरो मेन्टेनन्स) लागते. परिणामी, मनुष्यबळावर येणारा ताणही कमी होणार आहे.