बचत गट म्हटले की, ग्रामीण भागातील महिलांचे चित्र व त्यांची एकूणच संस्कृती डोळ्यापुढे उभी राहते. चंद्रपूरात झालेल्या बचत गटाच्या प्रदर्शनीत मॉडर्न फॅशनचे दागीणे मात्र या प्रदर्शनीत वेगळा ठसा उमटवून गेले. बरं, हे दागीणे ही काही यंत्रांनी बनविलेले नाहीत, तर एक महिलेने घरी तयार केलेले आहेत. आधुनिक फॅशनच्या बाजारात भूरळ पाडणारं जे काही मेट्रो सिटी मध्ये उपलब्ध आहे, ते थोडंफार या प्रदर्शनीत आणण्याचं श्रेय जात अबोली महिला बचत गटाच्या मिनाक्षी वाळके-सोनटक्के यांना.
मिनाक्षी जी सांगतात, शासनाने ही प्रदर्शनी लावून माझ्यासारख्या कित्येकींना वाव देण्याचं मोठ काम केलय. अनेक महिलांना मोठा आधार दिला. आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची प्रेरणा आणि प्रोत्साहनाची मोठी थाप पाठीवर ठेवल्यानेच महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे. मी पहिल्यांदाच येथे आली आणि चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला आहे. शासनाचे आभार मानने क्रमप्राप्त आहे. शिवाय आता राजुरा येथे बचत गटाचा पहिला मॉल येतोय, हे शासनाचे बचत गटांना मिळालेले मोठे वरदानच आहे. लोकप्रतिनिंधींनी बोललेला शब्द पूर्ण केला आणि प्रशासनाने त्याला आपल्या कृतीची योग्य जोड दिल्यानेच आज या ठिकाणी बचत गटांचा महोत्सव झाल्याचे कृतज्ञोक्ति मिनाक्षी यांनी केली.
मिनाक्षी यांची पाश्र्वभूमि ग्रामीण असतांनाही मॉडर्न ज्वेलरीची प्रेरणा मिळाली कशी? ते तयार करण्याचं कौशल्य शिकवलं कुणी? या प्रश्नांची उत्तरे प्रेरक आहेत. एक तर त्यांना कुणी शिकवले नाही, तसे प्रशिक्षणही त्यांना परवडणारे नव्हते. राजुरा येथील स्वाती गादेवार या आपल्या भाची कडे गेली असता तीने काही सजावटी च्या वस्तु दाखविल्या त्या बघून आणि माध्यमांतून प्रेरणा मिळाली. आणि आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेवून त्या घरीच प्रयोगशिल झाल्या. महिलांचे दागीणे, सणा-वाणाच्या वस्तू, पुजेची आकर्षक थाळी, कुंकवाचे करंडे, पेपर फ्लावर्स, टेडी बियर, पेपर बॉल, मॉडर्न रेडिमेड रंगोली, कुशन आणि डिझाईन्सच्या दुनियेत जे-जे म्हणून दिसतं ते सारंच तयार करण्याची क्षमता मिनाक्षी यांच्या मध्ये आली. त्यातूनच शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट शी जुळून शेतक-यांच्या विधवा, गरिब-वंचित मुली आणि तरुणींसाठी योगदान देण्याचा संकल्प त्यांनी केलाय. म्हणजे आपला, स्वकष्टाने उभारलेला स्वयंरोजगार इतरांच्याही कामी यावा, ही भावना घेवून त्यांची कर्मयात्रा सुरु आहे. इच्छुकांना आपण मोफत शिकवू, त्यांना प्रोत्साहन देवू, गरज पडल्यास त्यांना कामही देवू या उदारभावनेतून चाललेलं हे कलाविश्वाचं आगळं काम निश्चितच प्रेरणा देणारं म्हणावं. घरच्यांनी अभियांत्रिकीच्या शिक्षणास नकार दिला. बाहेरगांवी शिक्षणास मज्जाव केला. पुढे विवाहाने प्राणिशास्त्रातील पदवी ही घेता आली नाही. त्यामुळे आलेली जळमटे झटकून नव्या उमेदीने अडिच वर्षाच्या लेकराला सांभाळत उभं केलेलं हे कलाविश्वाचं आकाश अथांगच म्हटलं तर नवल नव्हे!