সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, February 24, 2018

तरुणाई व उद्योगांदरम्यानचा ब्रीज म्हणजे युथ एम्पावरमेंट समिट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- युथ एम्पावरमेंट समीटचा समारोप

नागपूर- आज तरुणाईसमोर बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. तर दुसरीकडे उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळत नाहीये. फॉर्च्युन फाऊंडेशनद्वारे आयोजित युथ एम्पावरमेंट समिट हा या दोघांमधला सेतू असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. फॉर्च्युन फाऊंडेशनद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय, महानगर पालिका आणि इंजिनियरिंग कॉलेज प्लेसमेंट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युथ एम्पावरमेंट समीटचा समारोप शनिवार, 24 फेब्रुवारीला डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. आ. अनिल सोले, आ. सुधाकरराव देशमुख, आ. मल्लीकार्जुन रेड्डी, आ. नागो गाणार, विक्की कुकरेजा, ईसीपीएचे सचिव कुणाल पडोळे, संदीप जाधव, जयंत पाठक, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून 16 लाख करोड रुपयांची गुंतवणूक होणार असून त्याद्वारे तब्बल 35 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून 8 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार होती. त्यापैकी आतापर्यंत सव्वापाच लाख करोड रुपयांचे करार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी असताना भारतीय अर्थव्यवस्थता 7 टक्के दराने वाढत आहे, असे सांगत त्यांनी जीडीपी हे आकडे नसून आर्थिक विकास व जीडीपीत वाढ आवश्यक असल्याचे मतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
जगामध्ये बंदर असलेल्या शहरांचा चांगला विकास झाला आहे. मात्र, जेथे बंदर नाही, त्यांचा विकास करावयाचा असेल तर त्यांना बंदरांशी जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शहरे जेएनपीटीशी जोडत असून त्यामुळे भौगोलिक परिस्थितीचा उद्योगांच्या उभारणीवर परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात कुठेही उद्योग उभारता येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राफेल विमानांचे 30 टक्के भाग आपण बनवित होतो. पण शंभर टक्के गुंतवणूक फायद्याची आहे, असे त्या कंपनीला वाटले. त्यांना योग्य ते कौशल्य विकसित मानव संसाधन पुरविण्यासाठी डिफेंस स्किल संदर्भात पार्क उभारणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मेक इन महाराष्ट्राद्वारे अगदी नंदुरबारसारख्या मागास जिल्ह्यांमध्येही गुंतवणूक आली असून हे या उपक्रमाचे यश असल्याचे यावेळी फडणवीस यांनी प्रतिपादित केले.
आज समाजात असलेल्या समस्या न्याहाळून त्या सोडविण्याच्या दृष्टीने कल्पक उपाय व नावीण्यपूर्ण उपक्रम केले तरी देखील रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विचार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
युवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आज एमपीएससीच्या जागा निघाल्या की 8000 पदांसाठी 3 लाख विद्यार्थी आवेदन करतात. सगळे एकाच वाटेवर चालल्याने या वाटा बोथट झाल्या आहेत. आपला वेगळा मार्ग निवडल्यास जग पादाक्रांत करता येईल. त्या अनुषंगाने लघू व मध्यम उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले व तरुणाईने उंच उडी घेण्याचे ठरविले तर क्षीतिज ठेंगणे पडेल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तत्पूर्वी आ. अनिल सोले यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून दोन दिवसात 25 हजार युव्वकांनी युथ एम्पावरमेंट समिटमध्ये नोंदणी केल्याची माहिती दिली. शिवाय दोन दिवसात 3 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले असून 500 हून अधिक मुद्रा योजनेंतर्गत निवडण्यात आले आहेत, अशी माहितीही दिली. मुद्रा बँकिंगचा प्रकल्प यशस्वी राबविल्याबद्दल डीपीओ फिरके आणि एलडीएम अयुब खान यांचेसह जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. पर्यावरण क्षेत्रात कार्य केल्याबद्दल सुरभी जयस्वालला गौरविण्यात आले. त्याच प्रकारे विविध उद्योगसमुहातील अधिकारी आणि महाविद्यालयातील प्रतिनिधींचाही सत्कार यावेळी करण्यात आला. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाद्वारे उमेश शामराव गणवीर यांना बीजभांडवलासाठी एक लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला. मनपाच्या समाज कल्याण विभागाद्वारे दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. प्रा. कुणाल पडोळे यांनी आभार व्यक्त केले.


उद्योजक होण्याचा विचार करावा : राजकुमार बडोले
सामाजिक न्याय विभाग आपल्यासोबत नेहमीच आहे. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ आपणास मिळेलच. पण भविष्यात आपण उद्योजक कसे व्हाल, यावर नक्की विचार करा. आपले प्रशिक्षण पूर्ण करून उद्योगांना सुरुवात करा, असा हितोपदेश महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिला. महात्मा फुले विकास महामंडळाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत तब्बल सहाशे विद्यार्थ्यांना त्यांच्या उपस्थितीत विद्या वेतन प्रदान करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आपण कौशल्य विकसीत करीत आहात पण आपण तयार केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग शिकले पाहिजे, असे बडोले यांनी विद्यार्थ्यांना सुचविले व मी आणि मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेच, असे आश्वासन त्यांनी दिले.
..............................................................................

 हंसराज अहिरांची युथ समिटला भेट
सकाळच्या सत्रात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी युथ एम्पावरमेंट समिटला भेट दिली. यादरम्यान त्यांनी समिटच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि याचा युवकांना नक्कीच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.