रिपब्लिकन हॉकर्स संघटनेच्या मागण्या फेटाळल्या
चंद्रपूर/प्रतिनिधी:
रविवार बाजारात फेरीवाल्यांनी स्वच्छता शिस्त राखावी, रहदारीस अडथळा होणार नाही,याची दक्षता घ्यावी ,स्थायी दुकानदारांना व रहिवाश्याना त्रास झाल्यास आठवडी बाजाराचे स्थळ बदलण्याचे व फेरीवाल्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत आयुक्त श्री. संजय काकडे यांनी दिले.
चंद्रपूर शहरातील फेरीवाल्यांच्या मागण्यांबाबत दि. २१/०२/१८ ला महानगरपालिकेत आयुक्त्यांच्या कक्षात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी फेरीवाल्यांची दोन संघटना उपस्थित होत्या. चंद्रपूर जिल्हा फुटपाथ दुकानदार संघटनेचे प्रतिनिधी तसेच रिपब्लिकन हॉकर्स सेना या संघटनेचे प्रतिनिधी तथागत पेटकर उपस्थित होते.
फेरीवाल्यांसाठी अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात यावी व त्यांचे आधार कार्ड मोबाइल नंबरशी जोडण्यात येऊ नये अश्या दोन मागण्या तथागत पेटकर यांनी प्रशासनासमोर मांडल्या, आयुक्तांनी दोन्ही मागण्या गैरकायदेशीर असल्याचे दर्शवून अमान्य केल्या. व त्यांना फेरीवाला समितीच्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर माहिती दिली.मनपाने राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ नुसार शहर फेरीवाला समिती गठीत केलेली आहे.
पथविक्रेत्यांना अधिवास प्रमाणपत्र सादर केल्यावर व आधार कार्ड मोबाइल नंबरशी संलग्न केल्यावरच फेरीवाला सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरु होईल, फेरीवाला सर्वेक्षण हे पूर्णपणे मोफत आणि पारदर्शक असल्याने पथविक्रेत्यानी कुठल्याही संघटनेच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन आयुक्तांनी याप्रसंगी केले.
फेरीवाल्यांना आपल्या संघटनांमध्ये ओढून राजकारण करणाऱ्या संघटनांनी फेरीवाल्यांकडून अवैध मार्गाने वसुली केल्यास किंवा पथविक्रेत्यांची दिशाभूल केल्यास या स्वयंभू संघटनांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.तसेच रविवार बाजारात फेरीवाल्यांनी स्वच्छता शिस्त राखावी, रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी ,स्थायी दुकानदारांना व रहिवाश्याना त्रास झाल्यास आठवडी बाजाराचे स्थळ बदलण्याचे व फेरीवाल्यावर कडक कारवाई करण्याचेही संकेत आयुक्त श्री. संजय काकडे यांनी दिले.