चंद्रपूर/प्रतिनिधी:
शिर्डी येथील प्रसिद्ध श्री साईबाबा संस्था विश्वस्त मंडळाच्या वतीने चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास साडेसात कोटींची देगणी देण्यात आली. शिर्डी संस्थेने ही रक्कम शासनाकडे जमा केली असून वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी मंजुरी प्रदान केली. या निधीतून एमआरआय (१.५ टेस्ला) मशिन खरेदी करण्यात येणार आहे. एमआरआय या अत्याधुनिक आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या रुग्णांसाठी ही मशिन संजिवनी ठरणार आहे.
देशाच्या धार्मिक क्षेत्रात शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरांची मोठी कीर्ती आहे. मंदिराचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील लाखो भाविक येतात. त्यामुळे दानधर्माच्या माध्यमातून संस्थेच्या उत्पन्नात दरवर्षी वाढ होत आहे. भाविकांना सर्व सोयीसुविधा स्वस्त दरात पुरविले जातात. शिवाय देशातील विविध जिल्ह्यांमध्ये समाजसेवेचे कार्य सुरू आहे. सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाºया लोकोपयोगी उपक्रमांमुळे संस्थेची प्रतिमा उंचावली. धार्मिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळविणाºया या संस्थेने चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास तब्बल साडेसात कोटी रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला होता. लगेच अंमलबजावणीही केली. ही रक्कम राज्यशासनाकडे जमा करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने या निधीतून एमआरआय मशिन (१.५ टेस्ला) घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. यंत्रसामुग्री तातडीने खरेदी करण्यासाठी बुधवारी प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यामुळे गरिबांच्या उपचारासाठी मोठी मदत होणार आहे.
हाफकिन बायो इन्स्टिट्युटच्या मार्गदर्शनात यंत्र खरेदी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमआरआय मशिन खरेदी करण्यासाठी उद्योग विभागाने कार्यपद्धती तयार केली आहे. यंत्रासामुग्री हाताळण्यासाठी पदनिर्मिती केली जाणार नाही. यंत्रसामुग्री खरेदी करण्याची जबाबदारी हाफकिन कंपनीला देण्यात आली. ही प्रक्रिया लवकरच होणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
अडचणी कायम
चंद्रपुरातील शासकीय रुग्णालयात पुरेशी अत्याधुनिक यंत्र सामग्री उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना संकटांचा सामना करावा लागतो. शिवाय, विविध विभागात रिक्त पदांचा अनुशेष कायम आहे. शासकीय वैद्यकीय वैद्यकीय सुरू झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.पण, अडचणी कायम आहेत.