विनापरवानगी सातत्याने गैरहजर राहणे भोवले
नागपूर- विनापरवानगी सातत्याने कामावर गैरहजर असणा-या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल 52 कर्मचा-यांवर महावितरणने कामावरून कमी करण्याची प्रक्रीया सुरु केली असून कामात दिरंगाई करणा-यांची गय केली जाणार नाही असा इशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिला आहे.
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या पाचही परिमंडलातील मानव संसाधन विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी कामावर सातत्याने गैरहजर असणा-या विदर्भातील 52 कर्मचा-यांवर तात्काळ कामावरून कमी करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक यांनी दिले. या कर्मचा-यांमध्ये अकोला परिमंडलातील चार, अमरावती आणि चंद्रपूर परिमंडलातील प्रत्येकी दहा, गोंदीया परिमंडलातील 11 तर नागपूर परिमंडलातील 17 कर्मचा-यांचा समावेश आहे. यामध्ये वर्ग 1 ते 4 मधील अधिकारी, अभियंते आणि कर्मचा-यांचा समावेश आहे.
शिस्तभंगाचा आरोप असलेल्या कर्मचा-यांवर सहा महिन्यांत सुनावणी घेत यथोचित कारवाई पुर्ण करण्याच्या सुचना देतांनाच अशी प्रकरणे प्रलंबित ठेवणा-यांविरोधातही कठोर कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. महावितरणचे ग्राहक सेवेला प्राधान्य असल्याने दैंनंदिन कामकाजात दिरंगाई आणि अनियमितता, कामचुकारपणा, विनापरवानगी कामावरून गैरहजर असणे, ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे आदी प्रकरणी दोषी आढळलेल्या आणि महावितरणची प्रतिमा मलीन करणा-यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, कुणाचीही पाठराखण केल्या जाणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही भालचंद्र खंडाईत यांनी दिला. कर्मचा-यांची उपस्थिती बायोमेट्रीक पद्धतीने घेऊन त्याआधारे त्यांचा पगार काढण्यात यावा, विलंबाने येणा-या कर्मचा-यांच्या पगारात नियमाप्रमाणे कपात किंवा गैरहजेरी लावण्याच्या सुचना देत शिस्तभंग कारवाई आणि बायोमेट्रीक हजेरीपटाचा नियमित आढावा घेण्याचे आदेशही त्यांनी बैठकीला उपस्थित मानव संसाधन विभागातील अधिका-यांना दिल्या. कार्यालयीन कामात बेशिस्त खपवून घेतल्या जाणार नसून याप्रकारची कारवाई यापुढेही सुरु ठेवण्याचे संकेतही त्यांनी दिले.
या बैठकीला नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफ़ीक शेख यांनीही मार्गदर्शन केले याप्रसंगी महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक वैभव थोरात, सहाय्यक महाव्यवस्थापक पांडूरंग वेळापुरे, रुपेश देशमुख, असित ढाकणेकर, शशिकांत पाटिल व महेश बुरंगे यांचेसह वरिष्ठ व्यवस्थापक व व्यवस्थापक स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.