সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, February 25, 2018

मन की बात

                                                           मन की बात                                                                     
आदरणीय पंतप्रधानजी,मी कोमल त्रिपाठी मेरठ हून बोलत आहे, 28 तारखेला राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे,भारताची प्रगती आणि देशाचा विकास विज्ञानाशी जोडला गेला आहे,विज्ञानात आपण जेवढे संशोधन करू नाविन्याचा शोध घेऊ तेवढी आपण प्रगती करू, भरभराट करू.आम्हा युवा वर्गाला प्रेरित करण्यासाठी, आमच्या विचारांना वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगत विचारांना प्रवृत्त करण्यासाठी ज्यामुळे देशाचीही प्रगती होईल यासाठी आपण काही सांगू शकाल का? धन्यवाद!

आपण फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. विज्ञानाबाबत माझ्या युवा मित्रांनी अनेक प्रश्न मला विचारले आहेत, काही ना काही लिहिले आहे. आपण पहिले आहे की समुद्राचा रंग निळा दिसतो मात्र दैनंदिन जीवनात आपण अनुभवतो की पाणी रंगहीन असते, त्याला रंग नसतो. नदी असू दे, समुद्र असू दे, त्यातल्या पाण्याला रंग का दिसतो,याचा आपण कधी विचार केलाय? 1920च्या दशकामध्ये एका युवकाच्या मनात हा प्रश्न आला. याच प्रश्नाने आधुनिक भारताचा एक महान वैज्ञानिक उदयाला आला. आप जेव्हा विज्ञानाबाबत बोलतो तेव्हा सर्व प्रथम मनात नाव येतं ते म्हणजे भारत रत्न सर, सी व्ही रामन यांचे. त्यांना लाइट स्कॅटरिंग म्हणजे प्रकाश प्रकीर्णनावरच्या उत्कृष्ट कार्यासाठी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते. रामन इफेक्ट या नावाने त्यांचा शोध प्रसिध्द आहे. 28 फेब्रुवारी या दिवशी रामन यांनी लाइट स्कॅटरिंगचा शोध लावला होता असे मानले जाते म्हणून आपण दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता.

या देशानं विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक महान वैज्ञानिक दिले.एकीकडे महान गणितज्ञ बोधायन, भास्कर, ब्रह्मगुप्त आणि आर्यभट्ट यांची परंपरा राहिली तर दुसरीकडे आरोग्य चिकित्सेमध्ये सुश्रुत आणि चरक आपल्या गौरवाचे स्थान आहेत. सर जगदीश चंद्र बोस आणि हर गोविंद खुराना यांच्यापासून ते सत्येंद्रनाथ बोस यांच्यासारखे वैज्ञानिक म्हणजे भारताचा गौरव आहेत. सत्येंद्र नाथ बोस यांच्या नावाने तर प्रसिध्द बोसोन कण असे नावही दिले गेले आहे.

नुकताच मुंबईत वाधवानी कृत्रिम बुद्धिमत्ता संस्थेच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला लाभली. विज्ञान क्षेत्रातल्या चमत्काराविषयी जाणून घेणे मोठे रंजक होतं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून रोबो, आणि विशिष्ठ काम करणारी यंत्र तयार करण्यासाठी मदत मिळते. आजकाल यंत्र स्व अध्यनातून स्वतःच्या बुद्धिमत्तेला आणखी स्मार्ट करत आहेत. या तंत्रज्ञानाचा उपयोग गरीब, वंचित आणि गरजुचे जीवन सुकर करण्यासाठी होऊ शकतो. कृत्रिम बुद्दीमत्तेच्या या कार्यक्रमात मी वैज्ञानिक समुदायाला आवाहन केलं होतं की दिव्यांग बंधु-भगिनींचे जीवन सुकर बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करता येईल?

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आपण नैसर्गिक आपत्तीबाबत अंदाज करू शकतो का? शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी काही मदत करू शकतो का? आरोग्य सेवा पोहोचण्यासाठी सुलभ व्हाव्यात आणि आजाराचा आधुनिक पद्धतीने उपचार व्हावा यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता मदतिची ठरू शकते का ?

काही दिवसांपूर्वी इस्त्रायलच्या पंतप्रधानांसमवेत गुजरातमध्ये अहमदाबाद मध्ये आय क्रिएट च्या उद्घाटनाला जाण्याची संधी मिळाली. तिथे एका युवकाने एक असे डीजीटल उपकरण विकसित केले होते की बोलता येत नाही अशा मूक व्यक्तीने आपले म्हणणे लिहिले की त्याचे आवाजात रुपांतर होते आणि आपण एखाद्या व्यक्तीशी बोलून ज्याप्रमाणे संवाद साधतो त्या प्रमाणे या व्यक्तीशीही संवाद साधू शकतो. अशा अनेक ठिकाणी आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करू शकतो असं मला वाटते.

विज्ञान आणि तंत्रज्ञान यांना स्वतःचे मुल्य नसते.आपल्या इच्छेप्रमाणे यंत्र काम करते.मात्र आपण यंत्राकडून काय काम करवून घेऊ इच्छितो ते आपल्यावर अवलंबून असते. इथे मानवी उद्देश महत्वाचा ठरतो. विज्ञानाचा मानव कल्याणासाठी उपयोग, मानवी जीवनाची सर्वोच्च उंची गाठण्यासाठी विज्ञानाचा उपयोग.

विजेच्या दिव्याचा शोध लावणारे थॉमस अल्वा एडिसन यांना आपल्या अनेक प्रयोगात अनेकदा अपयश आलं. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की विजेचे दिवे कसे बनवू नयेत याच्या दहा हजार पद्धती मी शोधल्या आहेत, म्हणजेच एडिसन यांनी आपल्या अपयशालाच आपली ताकद बनवली. योगायोगाने आज मी महर्षी अरविंद यांची कर्मभूमी ऑरोविले इथे आहे.एक क्रांतिकारक म्हणून त्यांनी ब्रिटीश शासनाला आव्हान दिलं, त्यांच्या विरोधात लढा दिला,त्यांच्या शासनाप्रती जबाब मागितला. एक महान ऋषी म्हणून त्यांनी जीवनातल्या प्रत्येक पैलू बाबत प्रश्न उपस्थित केला. त्याचे उत्तर शोधून मानवतेला मार्ग दाखवला. सत्य जाणण्यासाठी वारंवार प्रश्न विचारण्याची भावना महत्वाची आहे. वैज्ञानिक शोधाच्या मागे ही खरी खुरी प्रेरणाही असते. का, काय आणि कसे या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत तोपर्यंत स्वस्थ बसता कामा नये. राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त आपले वैज्ञानिक,विज्ञान क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या सर्वाना मी शुभेच्छा देतो. आपली युवा पिढी सत्य आणि ज्ञानाच्या शोधासाठी प्रेरित होवो, विज्ञानाच्या मदतीने समाजाची सेवा करण्यासाठी प्रेरित होवो, यासाठी माझ्या अनेक अनेक शुभेच्छा.

राष्ट्रीय सुरक्षा दिवस 
मित्रहो, पेच प्रसंगाच्या, संकटाच्या वेळी, सुरक्षितता, आपत्ती या विषयावर मला अनेक संदेश येतात, लोक काही ना काही लिहित असतात.पुण्याहुन रवींद्र सिंह यांनी नरेंद्र मोदी मोबाईल ॲपवर आपल्या प्रतिक्रियेत व्यावसायिक सुरक्षितते विषयी लिहिले आहे. ते लिहितात की आपल्या देशात कारखाने आणि बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा दर्जा तितकासा चांगला नाही. येत्या ४ मार्चला भारताचा राष्ट्रीय सुरक्षा दिवस आहे त्या निमित्ताने पंतप्रधानांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात सुरक्षितता हा विषय घ्यावा, ज्यामुळे लोकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढेल. सार्वजनिक सुरक्षितते विषयी आपण बोलत असतो त्यावेळी दोन गोष्टी महत्वाच्या असतात, तत्परता आणि तयारी. सुरक्षितता दोन प्रकारची असते एक जी आपत्तीच्या वेळी आवश्यक असते आणि दुसरी दैनंदिन जीवनात आवश्यक असते ती सुरक्षितता. दैनंदिन जीवनात आपण सुरक्षिततेविषयी जागरूक राहिलो नाही तर आपत्तीच्या वेळी सुरक्षितता मिळवणे कठीण होते.आपण सर्व जण अनेकदा रस्त्यावर लिहिलेली पाटी वाचतो,
- “सतर्कता हटी-दुर्घटना घटी”,

- “एक भूल करे नुकसान, छीने खुशियाँ और मुस्कान”,

- “इतनी जल्दी न दुनिया छोड़ो, सुरक्षा से अब नाता जोड़ो”

- “सुरक्षा से न करो कोई मस्ती, वर्ना ज़िंदगी होगी सस्ती”

त्याच्या पुढे आपल्या जीवनात या वाक्यांचा आपण आपल्या जीवनात काही उपयोग करत नाही. नैसर्गिक आपत्ती बाजूला ठेवली तर बऱ्याच दुर्घटना आपल्या कोणत्या ना कोणत्या चुकीचा परिणाम असतात.आपण सतर्क राहिलो, आवश्यक नियमांचे पालन केलं तर आपण आपल्या जीवाचे रक्षण करण्याबरोबरच मोठ्या दुर्घटनेपासून आपल्या समाजालाही वाचवू शकतो. आपण पाहतो की कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबाबत अनेक बाबी लिहिलेल्या असतात मात्र त्याचं पालन होताना दिसत नाही. ज्यांच्याकडे अग्नीशमन गाड्या असतात अशा महानगरपालिका, नगरपालिकांनी आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा वेग वेगळ्या शाळात जाऊन विद्यार्थ्यांसमोर मॉक ड्रील करायला हवं. याचे दोन फायदे होतील, अग्नीशमन दलालाही सतर्क राहण्याची सवय राहील आणि नव्या पिढीलाही याबाबत शिक्षण मिळेल आणि त्यासाठी वेगळा खर्च करण्याची आवश्यकता उरत नाही, एका प्रकारे शिक्षणाचा हा एक भाग बनतो आणि यासाठी मी नेहमीच आग्रही आहे. आपत्ती आणि संकटाबाबत बोलायचं झालं तर भारत भौगोलिकदृष्ट्या विविधतेने नटलेला आहे. या देशाने काही नैसर्गिक,मानवनिर्मित, आपत्ती आणि रासायनिक तसेच औद्योगिक दुर्घटना झेलल्या आहेत. एनडीएमए म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, देशाच्या आपत्ती व्यवस्थापनेकडे लक्ष पुरवते. भूकंप, पूर, वादळे, भूस्खलन यासारख्या आपत्तीत एनडीएमए तातडीने धाव घेते. त्यांनी मार्गदर्शक तत्वे जारी केली असून त्याच बरोबरीने क्षमता वृद्धी आणि प्रशिक्षणासाठी त्यांचे अखंड काम सुरु असते. पूर, वादळ प्रवण जिल्ह्यात आपदा मित्र म्हणून उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रशिक्षण आणि जागरूकता यांची महत्वाची भूमिका आहे. दोन-तीन वर्षापूर्वी उष्णतेच्या लाटेत दरवर्षी हजारो लोकांना प्राण गममावे लागत होते, त्यानंतर एनडीएमएने यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी अभियान हाती घेतले, कार्यशाळा आयोजित केल्या. हवामान विभागाने अचूक अंदाज वर्तवले या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे चांगला परिणाम जाणवला. 2017 मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत घट होऊन ही संख्या 220 पर्यंत आली. यावरून लक्षात येते की आपण सुरक्षिततेला प्राधान्य दिलं तर आपण सुरक्षितता प्राप्त करू शकतो. समाजात असं काम करणारे असंख्य लोक असतील,सामाजिक संघटना असतील, जागरूक नागरिक असतील, जे कुठेही संकट आले तरी क्षणात मदत आणि बचाव कार्यात स्वतःला झोकून देतात, मी या सर्वांची प्रशंसा करू इच्छितो. अशा प्रकाश झोतापासून दूर राहिलेले असंख्य नायक आहेत. अग्नीशमन सेवा,राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, सशस्त्र दल, अर्ध सैनिक बलाचे बहादूर जवान संकट काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता, जनतेची मदत करतात. एनसीसी आणि स्काउटही या कार्यात मदत करतात, प्रशिक्षण ही देतात. गेल्या काही दिवसात आम्ही एक प्रयत्न केला आहे, जगात अनेक देशांच्या संयुक्त लष्करी कवायती होतात तर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातही असा संयुक्त सराव का असू नये? भारताने याबाबत पुढाकार घेतला आहे. बीमस्टेक, बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, भूतान,नेपाळ या देशांचा संयुक्त आपत्ती व्यवस्थापन सरावही झाला, हा पहिला आणि व्यापक प्रयत्न होता. आपण, धोक्याबाबत सतर्क आणि जागरूक असलेला समाज बनायला हवे. आपल्या संस्कृतीत आपण मुल्यांचे रक्षण, मूल्य सुरक्षा याबाबत अनेकदा बोलतो, मात्र सुरक्षिततेचे मोल आपण जाणले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. ही मुल्ये आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजेत. आपण विमानाने प्रवास करताना विमानात सुरवातीला हवाई सुंदरी, सुरक्षिततेबाबत सूचना आणि माहिती देत असते. आपण शंभर वेळा या सूचना ऐकल्या असतील पण आज आपल्याला कोणी विमानात नेले आणि विचारले की सांगा कोणती गोष्ट कुठे आहे, जीवन रक्षक जाकेट कुठे आहे, त्याचा उपयोग कसा करायचा? मी खात्रीने सांगतो की आपल्यापैकी कोणीही नाही सांगू शकणार. माहिती देण्याची व्यवस्था होती का? तर होती. प्रत्यक्ष त्या बाजूला पाहण्याची शक्यता होती का? तर होती. मात्र आम्ही केले नाही कारण आमचा स्वभाव जाणीवपूर्वक ऐकण्याचा नाही म्हणूनच विमानात बसल्यानंतर आमचे कान ऐकतात, मात्र ही सूचना आपल्यासाठी आहे असं आपल्या पैकी कोणाला वाटत नाही. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात आपला असाच अनुभव आहे. आपण असा विचार करता कामा नये की सुरक्षितता कोणा दुसऱ्यासाठी आहे,आपण सर्वजण आपल्या सुरक्षितते प्रती जागरूक राहिलो, तर त्यात समाजाची सुरक्षितताही आपोआपच येते.

स्वच्छ भारत 
माझ्या प्रिय देश बांधवानो, या वेळच्या अर्थ संकल्पात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गावासाठी बायोगॅसच्या माध्यमातून टाकाऊतून संपत्ती आणि टाकाऊतून उर्जा तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी उपक्रम सुरु करण्यात आला असून त्याला गोबर धन असे नाव देण्यात आलं आहे. गाल्व्हनायझिंग ऑरगानिक बायो अग्रो रिसोर्सेस. गावे स्वच्छ ठेवणे आणि पशुधनाचे शेण, शेतातली पिकांची धाटे, यापासून कंपोस्ट खत आणि त्याचे बायोगॅसमध्ये रुपांतर करून त्यातून धन आणि उर्जा निर्मिती करणे. संपूर्ण जगात, भारतात पशुधनाची संख्या सर्वात जास्त आहे. भारतात साधारणपणे 30 कोटी पशुधन आहे आणि शेणाचे उत्पादन प्रती दिन 30 लाख टन आहे. काही युरोपीय देशात आणि चीन मध्ये शेण आणि जैविक उर्वरित भागापासून उर्जा उत्पन्न केली जाते मात्र भारतात याचा पूर्ण क्षमतेने उपयोग केला जात नव्हता. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत आपण या दिशेने आगेकूच करत आहोत.

गोबर धन
पशुधनाचे शेण, शेतातला राहणारा कचरा, स्वयंपाक घरातला कचरा या सर्वांचा बायोगॅसवर आधारित उर्जा निर्मितीसाठी उपयोग करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गोबर धन योजने अंतर्गत ग्रामीण भारतातल्या शेतकऱ्याला, बंधू-भगिनींना प्रोत्साहित केलं जाईल की शेण आणि कचऱ्याकडे केवळ टाकाऊ म्हणून पाहू नका तर उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून पहा. गोबर धन योजनेतून ग्रामीण भागाला अनेक लाभ होतील. गावं स्वच्छ राहण्यासाठी मदत होईल. पशु धनाची निगा राखली जाईल आणि उत्पादकता वाढेल, बायोगॅसने स्वयंपाक केल्याने उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णता वाढेल. शेतकरी आणि पशु पालन करणाऱ्यांना उत्पन्न वाढीला मदत होईल. कचरा गोळा करणे, त्याची वाहतूक, बायोगॅसची विक्री यातून रोजगाराच्या संधी वाढतील. गोबर धन योजनेच्या सुयोग्य अंमलबजावणी साठी एक ऑन लाईन मंच तयार करण्यात येईल ज्या द्वारे शेतकऱ्यांना ग्राहकाशी जोडले जाईल आणि त्याला शेणाला आणि कृषी टाकाऊ मालाला योग्य भाव मिळेल.मी उद्योजकांना विशेषतः ग्रामीण भारतात राहणाऱ्या भगिनींना आवाहन करतो की आपण पुढाकार घ्या. बचत गट तयार करून, सहकारी समित्या तयार करून, या संधीचा लाभ घ्या. स्वच्छ उर्जा आणि हरित रोजगार यासाठीच्या या चळवळीचा भागीदार बनण्यासाठी मी आपल्याला निमंत्रित करतो. आपल्या गावातल्या टाकाऊ चे संपत्तीत रुपांतर करण्यासाठी आणि शेणाचे धनात रुपांतर करण्यासाठी पुढाकार घ्या.

माझ्या प्रिय देश बांधवानो,

 रायपूरचे कौतुक 
आतापर्यंत आपण संगीत महोत्सव, खाद्य महोत्सव,चित्रपट महोत्सव अशा अनेक प्रकारच्या महोत्सवाबद्दल ऐकले आहे, मात्र छत्तीसगड मधल्या रायपुर मध्ये एक आगळाच प्रयत्न करत राज्याचा पहिला कचरा महोत्सव आयोजित केला गेला. स्वच्छतेप्रती जागरूकता हा यामागचा उद्देश होता.शहरातल्या टाकाऊचा कल्पक उपयोग करणे आणि कचऱ्याचा पुन्हा वापर करण्यासाठी वेग वेगळ्या पर्याया बाबत जागरूकता निर्माण करणे. या महोत्सवात अनेक उपक्रम झाले त्यादरम्यान विद्यार्थ्यापासून प्रौढापर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. कचऱ्याचा उपयोग करून वेग वेगळ्या कला कृती तयार केल्या गेल्या. कचरा व्यवस्थापनाच्या सर्व पैलूंविषयी लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी कार्य शाळा आयोजित केल्या गेल्या. स्वच्छता या संकल्पनेवर संगीतमय कार्यक्रमही झाला. कलाकृती निर्माण केल्या गेल्या. रायपूरपासून प्रेरणा घेऊन इतर जिल्ह्यातही वेगवेगळ्या प्रकारचे कचरा महोत्सव झाले. प्रत्येकाने स्वच्छते बाबत कल्पक विचार मांडले,चर्चा केल्या, कविता सादर केल्या. स्वच्छतेबाबत एक उत्सवी वातावरण निर्माण झाले. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी यात चढाओढीने भाग घेतला. कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेप्रती ज्या अभिनव पद्धतीने हा महोत्सव भरवला गेला त्याबद्दल मी रायपूर महानगर पालिका, छत्तीसगडची जनता इथले सरकार आणि प्रशासनाचे अभिनंदन करतो.
दर वर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशात आणि जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा या दिवशी गौरव केला जातो. आज देश महिला विकासाच्या पुढे जाऊन महिला नेतृत्वाखाली विकास या दिशेने वाटचाल करत आहे. या क्षणाला मला स्वामी विवेकानंद यांचे विचार आठवतात, त्यांनी म्हटले होते, आदर्श नारी संकल्पना म्हणजे परिपूर्ण स्वातंत्र्य. सव्वाशे वर्षापूर्वी स्वामीजीचा विचार भारतीय संस्कृतीतला नारी शक्तीबाबतचे चिंतन व्यक्त करतो. आज सामजिक, आर्थिक जीवनात प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान भागीदारी सुनिश्चित करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण अशा परंपरेचा भाग आहोत जिथे महिलांमुळे पुरुषांची ओळख केली जाते. यशोदा पुत्र, कौशल्य पुत्र, गांधारी पुत्र अशीच ओळख असायची मुलाची. आज आपल्या स्त्री शक्तीने आपल्या कार्यातून आपले आत्मबल आणि आत्मविश्वास यांची प्रचिती दिली आहे. स्वतःला आत्मनिर्भर केले आहे. स्वतःबरोबरच देश आणि समाजाला पुढे नेऊन नव्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे. महिला सशक्त आहेत, सबल आहेत, देशाच्या विकासात समान भागीदार आहेत हेच तर नव भारताचे स्वप्न आहे. गेल्या काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने मला एक चांगली गोष्ट सुचवली होती त्यांनी सांगितले की 8 मार्चला महिला दिनी अनेक कार्यक्रम होतात. प्रत्येक गावात आणि शहरात 100 वर्षे पूर्ण केलेल्या माताभगिनींचा सत्कार आयोजित केला जाऊ शकतो का? त्यांच्या जीवनाची प्रदीर्घ कहाणी जाणून घेता येऊ शकते का, मला हा विचार चांगला वाटला म्हणून आपल्या पर्यंत पोहोचवत आहे. स्त्री शक्ती जाणीव करून देणारी आपल्याला अनेक उदाहरणे मिळतील

आपल्या आजूबाजूला अनेक उदाहरणे आपल्याला प्रेरणा देतील आताच झारखंडमधून मला माहिती मिळाली स्वच्छ भारत अभियान अंतर्गत झारखंडच्या सुमारे 15 लाख, हा आकडा लहान नाही या महिलांनी संघटीत होऊन एक महिना स्वच्छता अभियान चालवले 26 जानेवारी 2018 पासून सुरु झालेल्या या अभियाना अंतर्गत 20 दिवसात या महिलांनी 1 लाख 70 हजार शौचालय निर्माण करून नवे उदाहरण ठेवले, यामध्ये 1 लाख महिला मंडळाचा समावेश आहे. 14 लाख महिला, 2 हजार महिला पंचायत प्रतिनिधी, 10 हजार महिला स्वच्छाग्रही 50 हजार राज मिस्त्री. आपण कल्पना करू शकता केवढी मोठी घटना आहे. झारखंडच्या महिलांनी दाखवून दिले आहे की नारी शक्ती, स्वच्छ भारत अभियांनाची एक अशी शक्ती आहे जी सामान्य जीवनात स्वच्छता अभियानाला स्वच्छतेच्या संस्काराला जनमानसाचा स्वभाव म्हणून परावर्तीत करेल.

बंधू-भगिनीनो, दोन दिवसापूर्वी मी बातमी पहिली की एलिफंटा बेटावर तीन गावात स्वातंत्र्याला 70 वर्षे झाल्यानंतर वीज पोहोचली, त्यानंतर तिथे लोकामध्ये आनंद पसरला.आपण जाणताच की हे बेट मुंबईपासून 10 किलोमीटर दूर आहे. हे पर्यटनाचे केंद्र आहे. एलिफंटा गुहा युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केले आहे. दरदिवशी तिथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. एक महत्वाचे पर्यटन केंद्र आहे. मुंबईपासून इतक्या जवळ असून पर्यटनाचे केंद्र असून इतक्या वर्षात तिथे वीज पोहोचली नव्हती हे जाणून मला आश्चर्य वाटले. 70 वर्षे एलिफंटामध्ये तीन गावात राजबंदर, मोरबंदर, सेट बंदर इथल्या लोकांच्या जीवनात अंधार पसरला होता तो जाऊन आता त्यांचे जीवन उजळले आहे.

मी तिथल्या प्रशासन आणि जनतेला शुभेच्छा देतो.मला आनंद आहे की एलिफंटा गाव आणि गुहा आता उजळून निघाली आहेत. हि केवळ वीज नव्हे तर नवी सुरवात आहे.देशवासीयांचे जीवन उजळून निघावे, त्यांच्या जीवनात आनंद यावा यापेक्षा आनंदाची बाब काय असू शकते.

माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आताच आपण महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला. मार्च महिना सळसळत्या पिकांचा, आम्र मंजिरीची पुलकित करणारी शोभा हे या महिन्याचे वैशिष्ट्य आहे. होळीच्या सणासाठी आपल्याला हा महिना प्रिय आहे. 2 मार्चला देशभरात होळी उत्साहात साजरी केली जाईल. होळीला रंगाचे महत्व आहे तितकेच होलिका दह्नालाही महत्व आहे दुष्ट प्रवृतीचे दहन करण्याचा हा दिवस आहे. सारे मत भेद विसरून एकत्र येऊन एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्याचा हा शुभ दिवस आहे. प्रेम आणि एकता आणि बंधुत्वाचा संदेश हा सण देतो. आपणा सर्वाना होळी आणि रंगोत्स्वाच्या खूप शुभेच्छा. हे पर्व आपल्या जीवनात आनंदाची मुक्त उधळण करणारे ठरो ही शुभेच्छा. हे पर्व आपल्या देशवासीयांच्या जीवनात आनंददायी राहो, या शुभेच्छा. माझ्या प्रिय देश बांधवांनो खूप खूप धन्यवाद,नमस्का

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.