रामटेक ( तालूका प्रतिनिधी ):
पारशिवनी तालुक्यातील गोंडेगाव, घाटरोहणा, कामठी OCM, इंदर, सिंगोरी कोळसा खाणींमुळे परिसरातील नागरिक प्रकल्पग्रस्त यांच्या प्रश्नांकडे वेकोलि प्रशासनाने केलेला दुर्लक्ष, प्रदूषणामुळे होणार त्रास, वेकोलीमुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध न होणे, घाटरोहणा, वराडा, गोंडेगाव, कांद्री, टेकाडी, सिंगोरी येथील नागरिकांच्या नोकरीचे प्रलंबित प्रश्न अश्या एकूण २५ प्रश्नांसाठी वेकोलि बाधित नागरिक संघर्ष समितीच्या वतीने रामटेकचे माजी आमदार अॅड.आशिष जयस्वाल यांनी वेकोलि प्रशासनाला दि.१६ फेब्रुवारी नंतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात दिलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी वेकोलि कार्यालयात अॅड.आशिष जयस्वाल व वेकोलि बाधित नागरिक संघर्ष समिती च्या सदस्यांसोबत वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. ज्यात जमिनीचे संपादन व नोकरी या बाबत चर्चा करण्यात आली. नवीन भूसंपादन कायद्याच्या तरतुदी नुसार मोबदला मिळेल परंतु वेकोलिच्या धोरणाप्रमाणे नोकरी दिल्याशिवाय जमीन देणार नाही व सर्व कोळसा खाणी बंद करू, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. ही बाब कोळसा मंत्रालयात प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. त्यावर हेच उत्तर आम्ही केव्हा पर्यंत ऐकणार, तात्काळ निर्णय द्या, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. त्यावर आम्ही नोकरी निर्माण करू व देऊ, असे वेकोलिकडून सांगण्यात आले. वेकोलीमुळे पाण्याची पाणी पातळी कमी होणे, धूळ व प्रदूषण मुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान, नागरिकांचे सामाजिक आर्थिक स्तर वाढविणे, आरोग्यसेवा, CSR निधी, खनिज विकास निधी, घाटरोहणा पुनर्वसन इत्यादी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या प्रकरणी वेकोलिने सर्व मुद्द्यांवर समाधान होईल असे लेखी उत्तर द्यावे अन्यथा आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे व प्रकल्पग्रस्त व नागरिकांच्या प्रश्नासाठी सर्वाधिक उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. आता वेकोलिच्या उत्तरानंतर दि.१५ ला गोंडेगाव येथे बैठकीत पुढची दिशा ठरवू, असे वेकोलि बाधित नागरिक संघर्ष समितीच्या वतीने अॅड.आशिष जयस्वाल यांनी सांगितले आहे. उपरोक्त चर्चेला वर्धराज पिल्ले, हरीश हेटे, अतुल हजारे, सुनील सहारे, सुनील नागतोडे, कोमलसिंग पहाडे, राठोड, यादव, तसेच वेकोलिच्या वतीने एस.टी.घोष, महाप्रबंधक. आई.आर., व्ही.के.गुप्ता, महाप्रबंधक एल.एन.आर., संदीप परांजपे, उपमहाप्रबंधक एल.एन.आर., दिवाकर गोखले, क्षेत्रीय महाप्रबंधक, नागपूर एरिया उपस्थित होते.