गोंडराणी हिराई यांनी पतीच्या आठवणीसाठी ही समाधी बांधली़ 'प्रेमाचे प्रतीक' म्हणून राजा बिरशहा यांच्या स्मारकाकडे पाहले जाते. राणी हिराईने राजा बिरशहा यांच्या मृत्युनंतर स्मारक उभारण्यासोबतच चंद्रपूर नगरीत शेकडो विधायक उपक्रम सुरू केले़ परिणामी, त्यांचे कार्य अजरामर झाले़ या कार्याची माहिती आजच्या युवा पिढीला माहीत व्हावे आणि क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, प्रेमाचा खरा अर्थ कळावा, याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला यंदा इको-प्रो आणि एफईएस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थिनींनी गोंड राजे बिरशहा यांच्या समाधीवर पुष्प अर्पण केले़
अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रभु चोथवे, इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. आनंद वानखेडे, रवींद्र गुरनुले, नितिन रामटेके, डॉ. सुखदेव उमरे, डॉ. प्रमोद रेवतकर, डॉ. सचिन बोधाने आदी उपस्थित होते. प्राचार्य चोथवे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. राजा बिरशहा यांची समाधी राणी हिराईने बांधून त्यांच्याप्रती असलेले प्रेम स्वत:च्या कार्यातून सिद्ध केले़ त्यामुळे राणी हिराईच्या कार्याचा इतिहास विद्यार्थ्यांनी समजून घेणे काळाची गरज आहे़ बिरशहा यांची समाधी म्हणजे निरागस प्रेमाचे प्रतीक असून या ऐतिहासिक वस्तुचे जतन करण्यासाठी शासनाने विशेष लक्ष द्यावे, असे मत प्राचार्य चोथवे यांनी मांडले़
बंडू धोतरे म्हणाले, युवकानी क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्याकरिता विशिष्ट दिवसांची गरज नाही. तर, कार्यातून व्यक्त व्हायला पाहिजे, यावेळी अनिल अल्लूरवार, बिमल शहा, राजू काहिलकर, अमोल उट्टलवार, हरीश मेश्राम, वैभव मड़ावी, अतुल राखुंडे आणि इको-प्रो नगर संरक्षक दलाचे कार्यकत तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.