সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, December 13, 2017

आनंदवनच समाजसेवेची शिदोरी- प्रकाश आमटे




१४ नोव्हेंबर, २०१७

देशाच्या राजधानीत राज्याचे सांस्कृतिक दूत म्हणून महाराष्ट्र परिचय केंद्र समर्थपणे कार्यरत आहे. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे हे कार्यालय राज्यशासनाच्या प्रसिध्दीची धुरा समर्थपणे सांभाळत आहे. कार्यालय आपल्या वैविद्यपूर्ण उपक्रमांसाठीही प्रसिध्द आहे. महाराष्ट्राचा गौरव वाढविणा-या व्यक्ती दिल्लीत काही कामानिमित्त येतात किंवा त्यांचा दिल्लीत झालेला राष्ट्रीय स्तरावर सन्मान या पार्श्वभूमीवर, कार्यालयात अशा मान्यवरांना आमंत्रित केले जाते. त्यांचा सत्कार आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व विविध क्षेत्रात कार्यरत दिल्लीतील मराठी जनांशी या कार्यक्रमात संबंधीत मान्यवारांच्या अनौपचारीक गप्पा रंगतात. मान्यवरांमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिध्द साहित्यीक भालचंद्र नेमाडे, प्रसिध्द इतिहासकार महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे या ठळक नावांसह राज्य शासनाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी, साहित्यीक, अभिनेते, अभिनेत्री यांचाही यात समावेश आहे.

...कार्यालयातील यावेळची भेट होती निस्सीम सेवाभाव हाच ज्यांच्या कार्याचा परिचय देश व जगभर पोचला आहे असे समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांची. डॉ. आमटेंच्या कार्याला समर्थपणे साथ देणारी त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आणि आई-वडीलांच्या कार्याची धुरा स्वत:हून सांभाळणारा मुलगा अनिकेत यावेळी उपस्थित असणे म्हणजे स्वर्णीम योग. गडचिरोली जिल्हयातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या चार दशकांपासून स्थानिक आदिवासींच्या उत्थानासाठी कार्यरत डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्र.- वैद्यक शास्त्राची पदवी घेतली असताना तुम्हाला स्वत:चा व्यवसाय थाटता आला असता तसे न करता आपण समाज कार्याकडे कसे वळला ?

उ.- मी वैद्यकशास्त्राची पदवी घेतली नंतर डॉ. मंदाकिनी यांच्याशी माझा प्रेमविवाह झाला. वडील बाबा आमटेंनी कुष्ठ रोग्यांच्या सेवेसाठी चंद्रपूर जिल्हयातील वरोरा येथे ‘आनंदवन’ प्रकल्प सुरू केला होता. बाबांनी त्याकाळात १९७३ मध्ये गडचिरोली जिल्हयातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे आदिवासींच्या उत्थानासाठी लोकबिरादरी हा प्रकल्प सुरु केला. बाबांनी मला या प्रकल्पाची धुरा सोपविली. आणि लग्नानंतर पत्नी डॉ. मंदाकिनीसह घनदाट जंगलातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प हेच आमचे जीवन कार्य व ध्येय निश्चित झाले व एप्रिल १९७४ मध्ये कामाला सुरुवात झाली. वडील बाबा आमटे आणि आई साधना आमटे यांनी आनंदवन ची उभारणी करून केलेले पहाडभर कार्यच समाजसेवेची शिदोरी म्हणून गाठीशी होती.


लोकबिरादरी प्रकल्प ज्या माध्यमातून आपण गेल्या ४ दशकांपासून कार्य करीत आहात, या प्रकल्पाची सुरुवात कशी झाली?


मी, या आधी उल्लेख केल्या प्रमाणे, बाबांनी या प्रकल्पाची मुहर्तमेळ रोवली आणि वैद्यकशास्त्राचा पदवीधर असलेला मी आणि पत्नी डॉ. मंदाकिनी आम्ही या प्रकल्पाची धुरा हाती घेतली. सर्वप्रथम स्थानिक आदिवासींना आरोग्य सेवा पुरविण्याकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले. मात्र, आदिवासींमधील अशिक्षीतता आणि त्यांच्या भाषेची आम्हाला नसेली ओळख यामुळे सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. पहिला रूग्ण आमच्याकडे आला आणि तो बरा होऊन परत गेला त्याने, इतरांना ही माहिती दिली तिथूनच आमच्या कामाला सुरुवात झाली आणि स्थानिक आदिवासी उपचारासाठी येऊ लागले. यानंतर आदिवासींचे तंटे बखडेही आमच्याकडे सोडवणुकीसाठी येऊ लागले आम्ही लोकअदालत भरवू लागलो. अशा रितीने कामाला सुरुवात झाली. या भागातील माडिया आदिवासींना आरोग्य, शिक्षण आदी सुविधांच्या माध्यमातून मुख्यप्रवाहात आणण्याची दिशा ठरली.

आपल्याकडे उपचारासाठी येणारे रुग्ण आणि उपलब्ध साधन साहित्यातून त्यावर होणारे उपचार याविषयी काय सांगाल?

प्रकल्पाच्या सुरुवातीला प्रतिकूल वातावरणात आम्ही स्थानिक आदिवासींना आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली. या भागात जंगली प्राण्यांच्या हल्यात जखमी होणारे रूग्ण, गरोदर माता, डोळयांच्या आजाराने ग्रस्त रूग्ण आमच्याकडे येत असत. जनावरांच्या हल्यात जखमी झालेल्या रूग्णांच्या जखमा धुवून उपलब्ध औषध देत असू. मात्र, एक प्रसंग मी सांगतो ! एक आदिवासी व्यक्ती आमच्याकडे आला. अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला होता आणि त्याच्या डोक्याच्या कवटीवरील मास पूर्णपणे निघाले होते अशात त्या रुग्णाला टाके लावणे गरजेचे होते. भूल देण्याचे औषध उपलब्ध नव्हते. मग आम्ही सुई आणि दोरा गरम पाण्यात टाकूण धुतला आणि भूल न देताच त्या रूग्णास टाके दिले. जवळपास १०० टाके दिले. रूग्ण अजिबात न डगमगता त्याने आम्हाला प्रतिसाद दिला. परिणामी, रूग्ण बरा होऊन घरी परत गेला. असे एकानेक प्रसंग घडलेत. आदिवासी स्त्रियाही काटक असतात त्यामुळे त्यांची बाळंतपण आम्ही उपलब्ध साधन सुविधांमध्ये केली. काही गोष्टींमध्ये आम्ही तज्ज्ञ नव्हतो पण रूग्णांना इतरत्र पाठविने हे शक्य नव्हते. त्यामुळे कोणत्याही आजारावरील उपचारासाठी आम्ही कधीही नकार दिला नाही. आणि उपलब्ध साधन सुविधेत विना मोबदला आरोग्य सेवा पुरविल्या. आम्ही काही प्रत्येक विषयातले तज्ज्ञ नव्हतो तरीही नेत्र, दात, अस्थी आदी आजारांशी संबंधित रूग्णांवरही आम्ही उपचार केले. काही पुस्तके वाचनातून आणि ज्ञानाच्या जोरावर हे सर्व निरपेक्ष भावनेने करीत आलो.

आता लोकबिरादरी प्रकल्पातील रुग्णालय कसे आहे, तिथे काय सुविधा आहेत?

सध्या या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधांनी सुसज्ज असा ५० खाटांचा सर्वोपचार दवाखाना उभा राहीला आहे. हा दवाखाना २०१४ मध्ये उभा राहिला असून, यासाठी ६ कोटींचा खर्च आला. समाजातील विविध क्षेत्रातून यासाठी मदतीचे हात पुढे आले. याठिकाणी सर्व प्रकारच्या आजारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांवर उपचार करण्यात येतात.

लोकबिरादरी प्रकल्पातील शाळेची ख्यातीही मोठी आहे, याबाबत आपण काय सांगाल?

मी आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली तेव्हा आरोग्या सोबतच शिक्षण विषयही आम्ही आदिवासींच्या उत्थानासाठी मुख्य अजेंडयावर घेतला. आम्ही शाळा सुरु केली. स्थानिक आदिवासींनाही शिक्षणाचे महत्व कळले व त्यांनी आम्हाला शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली. १९७६ पासून लोकबिरादरी शाळा सुरु झाली. या शाळेतून उत्तीर्ण झालेले मुल-मुली हे डॉक्टर, वकील, पोलीस, शिक्षक या व्यवसायात स्थिरावले उल्लेखनीय बाब म्हणजे यातील ९० टक्के विद्यार्थी हे याच भागात कार्यरत आहेत. आज या शाळेचीही ख्याती पंचक्रोशीत आहे. बालवाडी ते १२ वी पर्यंत शिक्षण या शाळेत देण्यात येते. आता शाळेला निवासी शाळेचे स्वरूप प्राप्त झाले असून, ६५० मुल-मुली येथे शिक्षण घेत आहेत. मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह उभारण्यात आले आहेत. मुलींच्या वसतीगृहात ३०० मुली तर मुलांच्या वसतीगृहात ३५० मुले आहेत. संगणकाची स्वतंत्र लॅब असून येथे ४० संगणक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आदिवासी विद्यार्थीही आता संगणक साक्षर झाल्याने विविध प्रकारचे ज्ञान ते संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अर्जित करीत आहेत. क्रीडा क्षेत्रातही ही मुले आघाडीवर आहेत. राष्ट्रीय व राज्यपातीळीवरील शालेय स्पर्धेत लोकबिरादरी शाळेच्या मुला मुलींना चमकदार कामगिरी केली आहे.

या प्रकल्पात प्राण्यांसाठी अनाथालय आहे, याच्या मागील संकल्पना काय आहे?

या भागातील आदिवासी हे जंगली प्राण्यांची शिकार करून खात असत. मी एकदा नेहमी प्रमाणे या भागात पायी फिरत असताना गावक-यांनी माकडाची हत्या केलेला प्रसंग पाहिला आणि इथेच प्राण्यांच्या अनाथालयाने जन्म घेतला. जंगली प्राण्यांची हत्या करून त्यांना मारू नका याविषयी आदिवासींना जागरूक केले. त्यांनाही याचे महत्व पटले आणि त्यांनी प्राण्यांची शिकार करने सोडले. आणि आता त्यांना जंगलात एखादा प्राणी, पक्षी जखमी अवस्थेत आढळल्यास ते लोकबिरादरी प्रकल्पात आणू लागले आहेत. याठिकाणी प्राण्यांवर उपचार करून त्यांची सेवा करण्यात येते. येथील प्राणी अनाथालयात येणा-या प्राणी व पक्षांना मायेचा लळा लागतो आणि ते कधी आपले होतात हे कळतही नाही. या अनाथालयातून बरेच प्राणी, पक्षी बरे होऊन जंगलात परत गेले. अशारितेने प्राणी, पक्षी अनाथालय हे ही लोकबिरादरी प्रकल्पाचा एक भाग झाला.

लोक बिरादरी प्रकल्पाची जबाबदारी आता तुमच्या मुलांनी म्हणजे आमटे कुटुंबियांच्या तिस-या पिढीने घेतली. याबद्दल काय सांगाल?

हो हे खरं आहे. आमचे आई-वडील बाबा आमटे आणि साधना आमटे यांच्या कार्याची जबाबदारी डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे या आम्हा दोघा भावांनी स्वीकारली. या कामात आम्हाला आमच्या अर्धांगिनींची मोलाची साथ लाभली. हीच परंपरा आता आमची मुलेही पुढे नेत आहेत. आता आम्ही लोकबिरादरी प्रकल्पाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहोत . हा प्रकल्प आता माझा थोरला मुलगा डॉ. दिगंत आणि सुन डॉ. अनघा तर धाकटा मुलगा अनिकेत आणि सुन समिक्षा यांनी हातात घेतला आहे. मुलांनी स्वत:हून ही जबाबदारी स्वीकारली आहे आणि आमचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प केला आहे.

आपले पहाडभर कार्य हे मानवी समाजासाठी मार्गदर्शक आहे . आपल्या जीवनकार्याचा परिचय करून देणारा ‘डॉ. प्रकाश आमटे द रियल हिरो’ हा चित्रपट आपल्या लेखनीतून साकार झालेले ‘प्रकाश वाटा’ हे पुस्तक सर्वांसाठी प्रेरणादयी आहे. आपल्या कार्याचा गौरव म्हणून केंद्र शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला. रॅमन मॅगसेसे पुरस्कारानेही आपला गौरव झाला आहे. आपले कार्य हे या पुरस्कारापेक्षाही मोठे आणि येणा-या पिढीला प्रेरक व मार्गदर्शक असेच आहे. समाजसेवेच्या आपल्या प्रेरणादायी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

- रितेश मोतीरामजी भुयार
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.