आजचे दगदगीचे जीवन जंगताना कर्मचा-यांना अनेक प्रकारचे आजार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये बीपी, शुगर, हार्ट इत्यादी प्रकारचे आजार सद्या 80 टक्के अधिकारी कर्मचा-यांना झाल्याचे निर्देशनास येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दारु, तंबाखू, खर्रा खाणे या सारखे व्यसन व व्हॉटसपवर तासनतास चिपकून राहणे इत्यादी प्रकारचे व्यसन एक आजार घेऊन येत असते. अशा प्रकारच्या व्यवसनापासून दूर राहिल्यास विविध आजारावर प्रतिबंध आणता येवू शकते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मा.सा.कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, स्वच्छ भारत मिशन व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांचेकरीता मुक्ती प्रकल्पाअंतर्गत ‘व्यसनमुक्ती आणि ग्रामगीता’ या विषयावर उदधवराव गाडेकर महाराज आकोट यांचा प्रबोधनपर कार्यक्रम नुकताच मा.सा.कन्नमवार सभागृहात पार पाडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक डॉ.रविंद्र शिवदास, उपमुख्य कार्यपालन अधिकारी श्री.संजय जोल्हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची रुपरेखा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सिंगलदिप कुमरे यांनी सादर केली. तर व्यसनमुक्ती व ग्रामगीतेच्या प्रबोधनपर कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना उदधवराव गाडेकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने गात अंधश्रध्दा व व्यसनमुक्तीचा संदेश यावेळी उपस्थितांना दिला. तसेच खंजेरी वादन करुन उपस्थित कर्मचारी वर्गाला मंत्रमुग्ध केले. दारुची दारुणता सांगतांना महाराज बोलले कसं चळलं दारुनं मन, हरपलं भान, पर्वा नाही उरली देहाची ! लाज खोवीली प्रतिष्ठेची ! जगी नाही किंमत कवडीची ! कुत्र्यापरी गति झाली त्यांची असे महाराजांनी आपल्या प्रबोधनातून सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.