श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव रॅलीच्या निमित्ताने तेली समाजाच्या वतीने शनिवारी शहरात काही ठिकाणी बॅनर लावले होते. मात्र न्यायालयाचे आदेश असल्याचे सांगत पालिकेने बॅनर काढून टाकले. परंतु, गुजरात राज्याच्या निवडणुकीत भाजपला बहुमत येताच अनेक ठिकाणी विनापरवानगीने बॅनर लागले. हे बॅनर हटविण्यात मनपाकडून दुजाभाव होत असल्याने बुधवारी तेली समाजबांधव मनपावर धडकले. आयुक्तांनी समाजाची माफी मागावी, अशी मागणी करीत मनपाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.
चंद्रपूर महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात होर्डींग्ज लावण्यावर बंदी घातली आहे. जागोजागी होर्डींग्ज लागत असल्यामुळे शहराचे विद्रुपिकरण होते, असे मनपाचे म्हणणे आहे. हा कायदा सर्वांसाठी सारखा असला पाहिजे. परंतु, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून व महानगर पालिकेच्या आशीर्वादाने विशिष्ट समाजाचे व सत्तेत असलेल्या पक्षाचे होर्डींग्ज वेळोवेळी शहरात लागत आहे. हे बॅनर हटविण्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे, असे तेली समाजाच्या पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.
२० डिसेंबरला जटपुरा गेटजवळ भाजपाने गुजरात विजयाचे मनपाच्या विनापरवानगीने होर्डींग्ज व बॅनर्स लावले. या बॅनर्सजवळ तेली समाज बांधवांनी तीव्र निदर्शने केली. त्यानंतर मनपावर धडक देत मनपाच्या कारभाराचा निषेध केला. त्यानंतर उपायुक्त देवळीकर यांच्याशी चर्चा करून भाजपाचे बॅनर्स काढण्यास लावले. बॅनर काढून भावना दुखावल्याप्रकरणी आठ दिवसात मनपा आयुक्ताने तेली समाज बांधवांची माफी मागावी, अन्यथा समाजबांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी माजी नगरसेवक आकाश साखरकर, दीपक बेले, राजेंद्र रघाताटे, सुधाकर लोखंडे, राजेश बेले, प्रवीण चवरे, आशिष मेहरकुरे, शेखर हजारे, गोलु तेलमाखे, अनुप बेले, पप्पु लोनकर, नितेश जुमडे यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.