अमरावतीचा संघ ठरला अजिंक्य - पटकाविले २५ हजारांचे रोख पारितोषिक
चंद्रपूर /प्रतिनिधी:-
बास्केटबॉल क्रीडाप्रकारासाठी आपली कारकीर्द वेचणा-या विदर्भातील ख्यातनाम बास्केटबॉल प्रशिक्षक स्व. प्रकाश फडणीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात नुकत्याच एका विदर्भस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यात बास्केटबॉल खेळाच्या विकासासाठी अथक परिश्रम करणा-या प्रकाश फडणीस यांचे मागील वर्षी नागपुरात अकाली निधन झाले होते. स्व. फडणीस यांनी यवतमाळ , अमरावती, चंद्रपूर, नागपूर , धुळे , लातूर आदी ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात बास्केटबॉल प्रशिक्षक रूपात कार्यरत असताना अक्षरशः शेकडो खेळाडू घडविले. राज्यभर बास्केटबॉल खेळाडू तयार करून या खेळाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणा-या स्व. प्रकाश फडणीस यांना याच खेळाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यासाठी खेळाडूंनी १५ ते १७ जानेवारी दरम्यान विदर्भस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. विदर्भातील १२ संघानी यात सहभाग घेतला. या स्पर्धेचा अंतिम सामना अमरावती आणि यवतमाळ या २ तुल्यबळ संघात चांगलाच रंगला. सामन्याच्या उत्तरार्धात अमरावती संघाने तुफान खेळ करत यवतमाळ संघाला पराजित केले.
समारोप सोहळ्याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर , शहर मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे , क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक , ज्येष्ठ क्रीडापटू महादेवराव दखने , दीपक जेऊरकर यांच्यासह फडणीस परिवारातील मीराताई फडणीस , श्रीमती कुमुद बावडेकर आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या चमूला २५ हजार रु. ची रोख रक्कम आणि चकाकती ट्रॉफी प्रदान करण्यात आली तर उपविजेता संघ आणि स्पर्धेत उत्तम कामगिरी करणा-या बास्केटबॉल खेळाडूंचा आकर्षक बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेतील तृतीय स्थान कारंजा संघाने प्राप्त केले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान यवतमाळ संघाच्या लीलाधर निमगुरकर याला प्रदान करण्यात आला. ३ दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी डॉ. राकेश तिवारी, फारुख शेख , मनीष पारखी , सोनू गज्जलवार , सुमेध चिकाटे , विकास वनकर आदींनी परिश्रम घेतले. स्व. प्रकाश फडणीस स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ही विदर्भस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.