आदिवासी नृत्य व गायनाची मिळणार जंगी मेजवानी
रामटेक तालुका प्रतिनिधी:
कालीदास समारोह नागपुरला आयोजित केल्याने रामटेक येथील कालीदास समारोह होणार की नाही असा प्रश्न विचारला जात होता.रामटेकचे आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रामटेकला कार्यक्रम झालाच पाहीजे असा आग्रह सरकारकडे धरला व यासाठी त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचेपर्यंत हा विषय नेला व त्यांनी रामटेकला कार्यक्रम देण्याचे आश्वासन दिले होते.त्यानुसार रामटेकच्या स्थानीक नेहरू ग्राउंडवर दिनांक 27 व 28 जानेवारी 2018 असे दोन दिवस हा कार्यक्रम ‘कालीदास राष्ट्रीय लोकमहोत्सव आणि आदिवासी संस्कृतीपर्व’या नावाने साजरा होणार असल्याची माहीती रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोशी यांनी स्थानीक बातमीदारांना सांगीतले.
उपरोक्त कार्यक्रमाविशयी आपल्या रामटेक येथील दालनात राम जोशी यांनी बातमीदारांशी संवाद साधला.उपरोक्त दोन दिवस सायंकाळी 6 ते 10 यावेळेत हा उत्सव साजरा होणार आहे.दिनांक 27 जानेवारी2018 रोजी सायंकाळी 6.00 वाजता या महोत्सावाचे उद्घाटन संपन्न होईल व त्यानंतर लगेच गणेशवंदना या कार्यक्रमाने समारोह प्रारंभ होणार आहे.या दिवशी राजस्थानच्या जैसलमेर येथील लंबी मंगणियार गृपचे प्रसिद्ध मंगणियार लोकगायन सादर केले जाणार आहे.यानंतरच्या क्रमात मध्यप्रदेशातील मंडला जिल्हयातील सैला व करमा आदिवासी नृत्याचे बहारदार सादरीकरण होईल. मध्यप्रदेशातीलच दिंडोरी येथील प्रसिद्ध गंडुबाजा नृत्य व महाराष्ट्रातील भामरागड येथील गेडी (सिंगमाडीया) हे प्रसिद्ध आदिवासी नृत्य व जैसलमेरच्या संपेरा या आदिवासी नृत्याने या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. दुसऱ्या दिवशी दिनांक 28 जानेवारीला रितु वर्मा यांचे पंडवानी गायन,नाशीक योथील सेंगीमुखोटा हे आदिवासी नृत्य,गडचिरोलीचे प्रसिद्ध लिंगो आदिवासी नृत्य,छत्तीसगढ येथील विख्यात पंथी लोकनृत्य,राजस्थानातील भवाई नृत्य,कन्हानची प्रसिद्ध खडीगंमत व शेवटी भंडारा येथील वेड लावणारे लावणी नृत्याच्या मेजवाणीचा रसिक श्रोत्यांना स्वाद घेता येणार आहे. रामटेकच्या नेहरू मैदानावर दोन दिवस संपन्न होणाऱ्या सोहळयाला हजारोंच्या सख्येंत रसिकांनी हजेरी लावावी व नृत्यगायनाचा आनंद घ्यावा असे आवाहन समारोह आयोजन समीतीच्या वतीने राम जोशी यांनी केले आहे.