- नगरसेवकांनी सहकार्य करावे, पालकमंत्र्यांचे आवाहन
- कचर्याची तक्रार 12 तासात सोडवली जाणार
स्वच्छता अभियानांतर्गत आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आढावा बैठक मनपाच्या टाऊन हॉल सभागृहात घेतली. या बैठकीला महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुद्गल आदी उपस्थित होते.
स्वच्छता अॅप हे नवीन तंत्रज्ञान असून शहर स्वच्छ ठेवणे आणि नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने परिणामकारक ठरणार आहे आणि आमूलाग्र परिवर्तनही घडविणार आहे. कोणत्याही व्यक्तीने कचरा पडला असल्याचा फोटो काढून या अॅपवर लोड केला, तर त्यात 12 तासात कारवाई करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने हे अॅप डाऊनलोड केले पाहिजे, यासाठी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांशी घरोघरी जाऊन संपर्क करणे व अॅप डाऊनलोड करण्यास त्यांना प्रवृत्त करायचे आहे. यामुळे महापालिकेला अधिक गुण मिळणार आहेत. बारा तासात तक्रार सोडविण्यात आली तर 150 गुण मिळणार आहेत. या अॅपवर आतापर्यंत 1500 तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी 86 टक्के सेाडविण्यात ÷आल्या, अशी माहिती आयुक्त मुद्गल यांनी यावेळी दिली.
स्वच्छता अभियानात सर्वेक्षणानंतर देशातील क्वालिटी कंट्रोलची एक चमू येऊन तपासणी करणार आहे. ही चमू झोपडपट्टी, विविध ठिकाणच्या कॉलनी, बाजारपेठा, धार्मिक स्थळे, 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणारी ठिकाणे, बसस्टँड, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक शौचालये या ठिकाणी भेट देणार आहेत. या संदर्भात नागरिकांच्या प्रतिक्रियाही ही चमू जाणून घेणार आहे. कोणत्याही नागरिकाला फोन करून 6 प्रश्न विचारले जातील. त्याची योग्य उत्तरे या चमूला मिळाली तर त्याचेही गुण महापालिकेला मिळतील. यासाठी नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड करावे यासाठी नगरसेवकांनी संपर्क अभियान राबविले पाहिजे, असेही पालकमंत्री बावनकुळे यांनी बैठकीत सांगितले.
येत्या 3 जानेवारीला देशात स्वच्छता अभियानाचे हे सर्वेक्षण सुरु होणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत देशातील पहिल्या 20 शहरात नागपूरचा 16 क्रमांक आहे. पण पहिल्या 10 शहरांमध्ये नागपूरचा समावेश व्हावा यासाठी नगरसेवक आणि नागपुरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असेही पालकमंत्री म्हणाले.