"मागेल त्याला सौर ऊर्जा कुंपन"योजना राबविण्याची मागणी
चंद्रपूर /प्रतिनिधी:
विदर्भातील वनव्याप्त शेतातील शेतपीक संरक्षण व व्याघ्र संवर्धनाच्या
दृष्टीने ‘मागेल त्याला सौर उर्जा कुंपन’ योजना वनव्याप्त शेतशिवारात
अनुदान तत्वावर राबविण्याच्या मागणीकरीता इको-प्रो संस्थेच्या वतीने ‘एक
दिवसीय बैठा सत्याग्रह’ आंदोलन मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त आला.
शेतशिवारात
वन्यप्राण्यांचा वावर वाढलेला असुन रानडुक्कर व रोही मुळे शेतपीक नुकसानीत
प्रचंड वाढ झालेली आहे. याकरीता संपुर्ण विदर्भातील वनालगतच्या शेतशिवारात
वन्यप्राण्यांकडुन होणारे शेतपीक नुकसान वाचविण्याकरीता मोठया प्रमाणात
तारेचे कुंपण करून त्यात जिवंत विदयुत प्रवाह सोडण्यात येत आहे. शेतशिवारात
आलेल्या रानडुक्कर व रोही या वन्यप्राण्यांच्या मागे त्यांची शिकार
करण्याकरीता वाघांचा वावर शेतशिवारात सहज बाब झाली आहे. त्यामुळे मागील
वर्षभरात चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, नागपूर आणी चंद्रपूर जिल्हयास लागुन
असलेल्या कागजनगर जिल्हयात एकुण 7 वाघ मृत्युच्या घटना समोर आलेल्या आहेत.
तसेच चंद्रपूर जिल्हयात वाघ व्यतीरीक्त रानगवे व अन्य वन्यप्राणी सुध्दा
मृत झाल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. यामुळे शेतकरी बांधवाना
सुध्दा कायदेशीर कार्यवाहीस सामोरं जावे लागत आहे.
वनव्याप्त
गावातील शेतशिवारात शेतपीक नुकसान समस्या सोडविण्यासाठी आणी वाघ व अन्य
वन्यप्राणी यांचे संरक्षण करण्याकरीता इको-प्रो च्या वतीने वेळोवेळी
वनविभाग, वनमंत्री व शासनाकडे मागणी लावुन धरण्यात आलेली आहे. याव्दारे
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर ‘व्यक्तीगत पातळीवर सौर उर्जा
कुंपन’ अनुदान तत्वावर जिल्हयातील प्रादेशिक वनक्षेत्रातील गावांना सुध्दा
देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. याच मागणीच्या अनुषंगाने ‘मागेल त्याला
सौर उर्जा कुंपन’ ही योजना शासनाने राबवावी या मागणीकरीता आज बुधवार, 20
डिंसेबर 2017 रोजी स्थानीक मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर
यांच्या कार्यालयासमोर ‘एक दिवसीय बैठा सत्याग्रह’ करण्यात येत आहे.