সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 23, 2017

पोलिसांना मालकी हक्काची घरे देणार


  • - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

नागपूर : चोवीस तास कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस आपले कर्तव्य चोख बजावजात. पोलिसांना सेवानिवृत्तीनंतर मालकी हक्काची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

पूर्व नागपुरातील लकडगंज पोलीस स्टेशनच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या स्मार्ट पोलीस स्टेशन व पोलीस गृहबांधणी प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी महापौर श्रीमती नंदा जिचकार, खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार सर्वश्री प्रा.जोगेंद्र कवाडे, प्रा.अनिल सोले, गिरीष व्यास, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ.मिलिंद माने, सुधाकर देशमुख, उपमहापौर जयदीप पार्डीकर, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम्, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

स्मार्ट पोलीस स्टेशन व पोलीस गृहनिर्माणचा हा प्रकल्प 144 कोटी 96 लक्ष रुपयांचा आहे. हा प्रकल्प 24 महिण्यात बांधून पूर्ण होणार आहे. 19 हजार 365 चौरस मिटरच्या जागेत 28 हजार 600 चौरस मीटर बांधकाम करण्यात येणार आहे. या जागेत आधुनिक स्मार्ट पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांचे कार्यालय, पोलीस शिपायांच्या निवासासाठी तिनशे सदनिका व पोलीस निरीक्षकांसाठी 34 सदनिकांची बहुमजली इमारत, व्यावसायिक संकुल, पाचशे लोकांकरिता सभागृह, क्लब हाऊस, जिम्नॅशियम, स्वतंत्र मलजल प्रक्रिया केंद्र, सौर ऊर्जेपासून 65 कि.वॅट विजनिर्मिती प्रकल्प व अद्ययावत अग्निशमन यंत्रणा आदी बाबी उभारल्या जाणार आहे.

स्मार्ट पोलीस स्टेशनची सेवा ही लोकाभिमुख व पारदर्शी राहणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सामान्य माणसाला न्याय मिळेल अशा प्रकारचे हे पोलीस स्टेशन राहणार आहे. केवळ पोलीस स्टेशन स्मार्ट राहणार नसून पोलिसांसाठी स्मार्ट टाऊनशिप येथे उभे राहणार आहे. सर्व सुविधायुक्त असा हा परिसर राहील.

पोलिसांच्या निवासाची समस्या सोडविण्यासाठी राज्यात एक लाख घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. यापैकी 47 हजार घरांचे नियोजन केले आहे. त्यापैकी 10 हजार घरांचे बांधकाम सुरु असून तीन हजार घरे बांधून पूर्ण झाली आहेत. उर्वरित 7 हजार घरांची निर्मिती प्रगती पथावर असल्याचे त्यांनी सांगितले. जेवढी घरे 40 वर्षात पोलिसांसाठी बांधली तेवढीचे घरे येत्या पाच वर्षात बांधण्याचे नियोजन असून ही घरे उत्कृष्ट व सुविधायुक्त राहणार आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबणाऱ्या पोलिसांचे आयुष्य सरकारी निवासस्थानातच निघून जाते, असे सांगून श्री.फडणवीस पुढे म्हणाले, खाजगी विकासकांच्या माध्यमातून पोलिसांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी शासनमार्फत प्रयत्न केले जातील. या घरांसाठी पोलिसांना मूळ वेतनाच्या दोनशे पट गृहकर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच व्याजावर सबसिडी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याला व्याजदर सवलत द्यायचे ठरले आहे. ही घरे उपलब्ध करुन देणाऱ्या विकासकांना अडीच टक्के एफ.एस. आय. उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपूरमध्ये करण्यात येत असलेल्या विकास कामाबाबत आपल्या भाषणातून प्रकाश टाकला.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचे भुमीपूजन केले. व्यासपिठावर लकडगंज प्रभागातील नागरिकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठया पुष्पहाराने स्वागत केले. कार्यक्रमाला पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, पूर्व नागपूर व लकडगंज भागातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडके यांनी केले. संचालन राहुल माकणीकर यांनी केले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.