नागपूर/प्रतिनिधी:
विदर्भातील विविध जंगलांमध्ये जानेवारी ते आॅगस्ट २०१७ या आठ महिन्यांत १५ वाघांचा निरनिराळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. यातील १० वाघांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचा दावा शासनातर्फे करण्यात आला आहे. विधानपरिषेदत संजय दत्त, शरद रणपिसे, रामहरी रूपनवर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
आठ महिन्यांत दोन वाघांचा मृत्यू विद्युत प्रवाहामुळे तर इतर कारणांमुळे तिघांचा मृत्यू झाला. वनविभागातील नागपुरातील खापा व ब्रम्हपुरीतील नागभीड या वनपरिक्षेत्रात शेतकऱ्यांनी शेतीत लावलेल्या विद्युत प्रवाहामुळे दोन वाघांचे मृत्यू झाले. तर उर्वरित तीन वाघांच्या मृत्यूप्रकरणात १७ आरोपींना अटक करण्यात आली, असे उत्तरात नमूद करण्यात आले.