येथील सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन येत्या १० व ११ फेब्रुवारीला स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
दोन दिवसीय या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन १० फेब्रुवारीला ज्येष्ठ विचारवंत व कवी डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी प्रख्यात कादंबरीकार, कथालेखक राजन खान हे राहणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे ,महापौर अंजली घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश इंगोले हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.संमेलन समितीचे संवर्धक शांताराम पोटदुखे हे असून संमेलनाच्या स्वागताध्यक्षा तनुजा दिलीप बोढाले आहेत. आदिवासी साहित्य-चर्चा व चिंतन, नव्वदोत्तरी ग्रामीण आणि जनसाहित्य-चर्चा आणि चिंतन, नव्वदोत्तरी आंबेडकरी साहित्य-चर्चा आणि चिंतन, मुस्लिम मराठी साहित्य-चर्चा आणि चिंतन हे चार चर्चासत्राचे विषय आहेत. जिल्ह्यातील साहित्य ज्योतिला अधिक प्रकाशमान करण्यासाठी सदर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संमेलन समितीचे कार्याध्यक्ष इरफान शेख यांनी दिली.