दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल
नागपूर/प्रतिनिधी :चंद्रपूरच्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवीत हिंगणघाट (जि. वर्धा) येथील एका व्यावसायिकाने तिच्याशी शरीरसंबंध जोडले. तिचा गर्भपात करून आता तिला लग्नास नकार देणाऱ्या अमित राजेंद्र चाफले (रा. प्राध्यापक कॉलनी, हिंगणघाट) तसेच त्याच्या परिवारातील दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
फिर्यादी तरुणी (वय २४) चंद्रपूर येथील एमबीएची विद्यार्थिनी आहे. आरोपी अमित चाफले हा हिंगणघाट शहरातील मोठा व्यावसायिक आहे. त्याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. या दोघांनी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. १७ एप्रिल २०१७ ला तिला अमितने अजनीतील ओंकारनगरात बोलवून घेतले. तेथे त्याने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध जोडले. तेव्हापासून २४ जून २०१७ पर्यंत त्यांच्यात अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित झाल्याने ती गर्भवती झाली. त्यामुळे आरोपी अमित, त्याचे वडील राजेंद्र चाफले तसेच पूजा चाफले यांनी तिला अशा गर्भवती अवस्थेत लग्न करणे योग्य होणार नाही, असे समजाविले. त्यानंतर तिला काही गोळ्या खायला दिल्या. त्या खाल्ल्यामुळे तरुणीचा गर्भपात झाला. त्यानंतर मात्र आरोपी तिला टाळू लागला. तिने लग्नासाठी तगादा लावला असता आरोपी अमितने तिला तिच्यासोबतचे एकांतातील फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिली. तो लग्नास नकार देत असल्याचे पाहून तरुणीने चंद्रपूरच्या रामनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तेथे गुन्हा दाखल केला. मात्र, प्रकरण अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे ती केस डायरी अजनी पोलिसांना पाठविली. अजनी पोलिसांनी आरोपी अमित, राजेंद्र आणि पूजा चाफले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.