चंद्रपूर- जागतिक एड्स दिन म्हणून दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा एडस नियंत्रण व प्रतिबंधन पथक, आय. एम. ए., मिलाप बहुउद्देशीय सेवा संस्था, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर, नेहरू युवा केंद्र, इनरव्हिल क्लब ऑफ चंद्रपूर व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना यांच्या सहकार्याने रेलीचे व आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘ माझे आरोग्य माझा अधिकार ’ या विषयावर आयोजित या कार्यक्रमात असुरक्षित लैंगिक संबंध, दुषित सुया, एचआयव्ही बाधित मातेकडून होणाऱ्या बाळास एचआयव्ही एड्सचा प्रसार होत असल्याने याबाबत सुरक्षिततेचे महत्व लक्षात घेऊन भव्य जनजागृती रेलीचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील मुख्य रस्त्यावरून एड्स दिनी काढण्यात आलेल्या या रेलीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुनघाटे, डी. पी. ओ. राम पानगंटीवार, डॉ. मंगेश गुलवाडे, आय.एम.ए. चे डॉ. मनिष मुंधडा, जिल्हा विधी प्राधिकरण चंद्रपूरचे बालवाणी आदींनी हिरवी झेंडी दाखवली.
या रेलीत मिलाप बहुउद्देशीय सेवा संस्थेचे विशाल जोगी, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर चे अरुण तिखे, नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा समन्वयक संजय माटे, इनरव्हिल क्लब ऑफ चंद्रपूर चे विद्या घुसे, विहान संस्था, संकल्प संस्था, नोबेल शिक्षण संस्था, संबोधन संस्था, स्व. डॉ. वसुधा झाडे नर्सिंग कॉलेज, जनहिताय संस्था, सुशीलाबाई रामचंद्र कॉलेज ऑफ सोशल वर्क, सरदार पटेल महाविद्यालय व राजीव गांधी ईजिनिअरींग कॉलेज आदींनी सहकार्य केले.