नागपूर -‘सत्तेचा दर्प असा चढतो की अशा वेळी क्लोरोफॉर्म देण्याचीही गरज पडत नाही. केंद्रीय नितीन गडकरी यांचीही सध्या तशीच परिस्थिती झाली आहे. त्यामुळेच ते वेगळ्या विदर्भाच्या आश्वासनावरून घुमजाव करीत आहेत. परंतु आता विदर्भातील जनता शांत बसणार नाही. वेगळ्या विदर्भासाठी ११ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या विदर्भ बंदची तयारी पूर्ण झाली असून विदर्भातील अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिल्याने हा बंद यशस्वी होणारच, असल्याचा दावा माजी आमदार आणि शेतकरी नेते वामनराव चटप यांनी शनिवारी केला.विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे ११ डिसेंबर रोजी वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता विदर्भ बंद पुकारण्यात आला आहे. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चटप बोलत होते.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ११ डिसेंबर रोजी हा बंद पुकारण्यात आला आहे. याकरिता ११ जिल्ह्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. विदर्भातील सर्व विदर्भवादी संघटनांनी या बंदला आपले समर्थन दर्शविले आहे. यात विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ कनेक्ट, विदर्भ माझा, जनमंच, जनसुराज्य पार्टी तसेच रिपबक्लिन पक्षाचे आठवले, खोबाग्रडे, गवई आणि जोगेंद्र कवाडे यांच्या गटाच्या पक्षांनीही या बंद सहभाग घेण्याचे ठरविले आहे. याखेरीज बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स यांनीही या बंदला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.’