नागपूर सि.एम.डी. कार्यालयावरील जोरगेवारांच्या आंदोलनाला यश
२०१६ पासून वेकोली तर्फे भरण्यात न आलेल्या माईनिंग सरदार आणि ओव्हरमेंन यांच्या जागा तात्काळ भरण्यात याव्यात या मागणीसाठी नागपूर येथील सिएमडी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या किशोर जोरगेवार यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून वेकोलीच्या नागपूर विभागातील ३३३ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे माईनिंग सरदार आणि ओव्हरमेंन चे प्रशिक्षण घेतलेल्यांना रोजगार मिळणार आहे.
वेकोली मध्ये नौकरी लागेल या आशेने नागपूर विभागातील विद्यार्थ्यानी मायनिंग सारख्या महागड्या विभागात शिक्षण घेतले मात्र नागपूर विभागातील वेकोली कडून २०१६ पासून माईनिंग सरदार आणि ओव्हरमेंन यांच्या जागा भरण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे या विभागातील माईनिंग मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे जागा निघण्याच्या प्रतीक्षेत होते. परंतु तीन वर्षाचा काळ लोटत आला तरी जागा निघत नसल्याने त्यांच्यावर नौकरीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. त्यामूळे या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. या मागणीच्या पुर्तेसाठी १८जुलै २०१८ ला नागपूर येथील सी.एम.डी. वेकोली कार्यालयासमोर किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर या मागणीसाठी जोरगेवार यांनी सतत पाठपूरावा करत अधिका-यांची बैठका केल्या होत्या. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वेकोलीच्या नागपूर विभागाच्या वतीने माईनिंग सरदार आणि ओव्हरमेंन यांच्या ३३३ जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. तशी जाहिरातही त्यांच्या कडून प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता उत्तीर्ण होऊनही तिन वर्षापासून रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या चंद्रपूरातील या युवकांना रोजगार मिळणार असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.