चंद्रपूर/ प्रतिनिधी :
वहाणगावचे उपसरपंच प्रशांत कोल्हे ला तडीपार केल्याच्या निषेधार्थ २० नोव्हेंबर ला
मनसेतर्फे चिमूर तालुक्याच्या वतीने चिमूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर
मुंडन आंदोलन करणार आहे. चिमूर तालुक्यातील दीड ते दोन हजार
लोकवस्ती असलेल्या वहाणगाव येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा महापूर वाहत
होता. या प्रकाराकडे पोलिसांनी मात्र दुर्लक्ष केले होते.
या अवैध दारूविक्रीचा गावातील महिला, विद्यार्थी , शाळकरी
मुलींना त्रास होत होता. त्यामुळे वहाणगाव येथील नागरिकांनी ग्रामसभा घेऊन
गावातील अवैध दारू विक्री बंद करा अन्यथा गावात ग्रामपंचायतीला फलक लावून
दारू विक्री ची परवानगी द्या असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते पारित केला. या
ठरावाच्या अंमलबजावणी करिता आंदोलने उभारली मात्र शेगाव पोलीस आणि
उपविभागीय अधिकारी चिमूर यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावात येऊन जिल्ह्यातील
दारूविक्री बंद करण्याऐवजी दारूबंदी विरुद्ध आंदोलन करणाऱ्या वहाणगाव चे
उपसरपंच प्रशांत कोल्हे यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले.
प्रशासनाने अवैध दारू विक्रेत्यांना पाठीशी घालून अवैध
दारूविक्री विरुद्ध आंदोलन करणाऱ्यांनाच तडीपार करून जिल्ह्यात जंगलराज
आणण्याचा आरोप करत वहाणगाव येथील आंदोलन मात्र २ महिन्यांच्या कालावधीत
करण्यात आले. या २ महिन्यातीलच कालावधीत तालुक्यातील व जिल्ह्यातील कायदा
सुव्यवस्था धोक्यात आली काय ? असा प्रश्न करत मागील अडीच वर्षांपासून
जिल्ह्यात अवैध दारूविक्री करण्यात येत आहे. या अवैध दारूविक्रेत्यांकडून
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था लक्षात आली नाही का ? अवैध दारू
विक्रीविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यातील व तालुक्यातील
कायदा सुव्यवस्था बिघडली काय ?
असा सवाल करत
लोकशाही मार्गाने प्रशासनाचा निषेध करण्यासाठी चिमूर तालुका मनसेकडून २०
नोव्हेंबर ला उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या कार्यालयासमोर मुंडन आंदोलन
करून प्रशासनाचा निषेध करत प्रशांत कोल्हेवर केलेली तडीपारीची कारवाई मागे
घेण्यात यावी या साठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.