एटापल्ली तालुक्यातील झारेवाडा जंगलातील घटना
गडचिरोली /प्रतिनिधी पोलीस आणि नक्षलवाद्यांचा वाद काही संपता संपेना मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी एटापल्ली तालुक्यातील गट्टा - जांभिया पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या झारेवाडा येथील जंगलात सशस्त्र नक्षल्यांनी एका युवकाची गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली. मनोज राजू नरोटे रा. झारेवाडा, असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार गट्टा -जांभिया पोलिस ठाण्यापासून १० किमी अंतरावरील झारेवाडा गावानजीकच्या जंगल परिसरात आज मनोज नरोटे याचा मृतदेह आढळून आला. ३ वर्षापूर्वी झारेवाडा येथील रमनी आत्राम या महिलेचा खून झाला होता. तेव्हापासून मनोज नरोटे फरार होता. २ महिन्यांपूर्वीच तो गावात परत आला असल्याची माहिती नक्षलवाद्यांना मिळाली. मात्र, आज त्याचा मृतदेह आढळून आला. रमनी आत्रामच्या खुनात मनोज नरोटे याचा सहभाग असल्याचा काही जणांचा संशय होता. त्यामुळे मनोजची हत्या नक्षल्यांनी केली की अन्य कुणी, याबाबत साशंकता आहे.
चालू आठवड्यात नक्षल्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन धानोरा तालुक्यातील ३ युवकांची हत्या केली. शिवाय कोटगूल येथील भू-सुरुंगस्फोटात हवालदार सुरेश गावडे, तर पडियलमेट्टा जंगलात झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे जवान मंजुनाथ शिवलिंगप्पा हे शहीद झाले. या दोन घटनांमध्ये चार पोलिसही जखमी झाले आहेत. या घटनांवरून झारेवाडा येथील मनोज नरोटेच्या हत्येत नक्षल्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, घटनास्थळी नक्षल्यांनी कुठल्याही प्रकारचे पत्रक न टाकल्याने साशंकता आहे.