সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 26, 2017

चंद्रपुरातील रस्ते होणार मोकळे ; फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र

चंद्रपूर- चंद्रपुरातील रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी मनपाने फुटपाथ तयार केले. मात्र व्यावसायिकांनी ते गिळंकृत केले आहे. आधीच अरुंद रस्ते हातठेले व फेरीवाल्यांमुळे आणखी अरुंद झाले. मात्र आता या व्यावसायिकांचे इतर ठिकाणी झोन तयार करून पुनर्वसन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्या दृष्टीने मनपाची कार्यवाही सुरू झाली असून लवकरच चंद्रपुरातील फुटपाथ रिकामे होऊन बरबटलेले रस्ते सुटसुटीत होणार आहेत.

चंद्रपूर शहरातील महात्मा गांधी मार्ग, कस्तुरबा मार्ग, पठाणपुरा मार्ग, गांधी चौक मार्ग, तुकूम परिसरातील मुख्य रस्ता, मूल मार्ग आदी अनेक मार्गावर रस्त्याच्या बाजुला, फुटपाथवर फेरीवाल्यांनी आपली बाजारपेठ थाटली आहे. शहरात सुमारे ३ हजार फेरीवाले किरकोळ व्यावसायिक आहेत. या छोटेखानी दुकानावरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र या व्यावसायिकांची आतापर्यंत नोंदणीच करण्यात आली नव्हती. त्यांच्यावर कुणाचाही वचक नव्हता. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली की त्यांना हटविले जायचे. त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे. कुणाचाही वचक नसल्याने फुटपाथवर किंवा रस्त्याच्या कडेला किरकोळ व्यावसायिकांचा मेळाच तयार होऊ लागला. मात्र आता ही स्थिती बदलणार आहे.
महानगरपालिकेने रस्त्यावरील, फुटपाथवरील फेरीवाले, हातठेले, किरकोळ व्यावसायिक यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच शहरात विशिष्ट ठिकाणी फेरीवाल्यांसाठी झोन तयार केले जाणार आहे. या झोनमध्येच फेरीवाल्यांना आपली दुकाने थाटता येणार आहे. इतर कोणत्याही ठिकाणी हातठेले व इतर फेरीवाले दिसणार नाही. या दृष्टीने मनपाने आपली कार्यवाही सुरूही केल्याची माहिती आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे निर्देश
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी तीन महिन्यांपूर्वी एक बैठक घेऊन शहरातील फुटपाथ रिकामे करण्याचे निर्देश दिले होते. मात्र असे करताना फुटपाथवरील व्यावसायिकांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावू नका, त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करा, असेही स्पष्ट केले आहे. ही बाब फुटपाथवरील व्यावसायिकांना दिलासा देणारी आहे.
फेरीवाल्यांना ओळखपत्र मिळणार
फेरीवाल्यांचे सर्वेक्षण व ओळखपत्र तयार करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठी शासनाने एक साफ्टवेअर तयार केले आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांना एकदा प्रशिक्षण देण्यात आले आहे. साफ्टवेअरची लिंक अद्याप यायची आहे. लिंक आल्यानंतर आणखी एकदा कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर व्यावसायिकांची संपूर्ण माहिती साफ्टवेअरमध्ये अपडेट करून ओळखपत्र तयार केले जाणार आहे, अशी माहिती मनपाचे अधिकारी रफीक शेख यांनी दिली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.