गडचिरोली/प्रतिनिधी:
गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटझेरी येथे पोलीस मदत केंद्राच्या बांधकामासाठी २ हेक्टरची संरक्षित वनजमीन वळती करण्यास मान्यता देण्यात आली असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या पोलीस मदत केंद्रामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास तसेच अवैध वृक्षतोड रोखण्यास मदत होणार आहे. पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने सार्वजनिक हिताच्यादृष्टीने उपयुक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ५ हेक्टरपर्यंतची वन जमीन वळती करण्याच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकार राज्य शासनाला सुपुर्त केले आहेत. या अधिकाराचा वापर करून वनमंत्री म्हणून यासंबंधीच्या अटी आणि शर्तींचे पालन करत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
गडचिरोली हा केंद्र शासनाने देशातील ६० नक्षलग्रस्त प्रभावित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट केलेला जिल्हा आहे. वळती करण्यात आलेली वनजमीन ही या नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाच्या कामासाठी वापरण्यात येणार असल्याने त्यास मान्यता देण्यात आली आहे