সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 18, 2017

विदर्भ सांस्कृतिक वैभवाचे प्रतिक कालिदास महोत्सवास थाटात प्रारंभ

नागपूर: नागपूरसह विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतिक ठरलेले कालिदास महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलित करुन झाले. यावेळी पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवाला ध्वनीचित्रफीतीच्या माध्यमातून खास संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या.

कवि कुलगुरु कालिदास यांच्या ‘ऋतुसंहार’वर आधारित या महोत्सवाचे कालिदास महोत्सवाचे आयोजन समिती, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि नागपूर महानगरपालिका यांच्यातर्फे सुरेश भट सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात तीन दिवस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलावंत सहभागी होणार असून कलेचा अविष्कार सादर करणार आहेत. हा महोत्सव नागपूरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.

रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात कालिदास समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर नंदाताई जिचकार, खासदार अजय संचेती, आमदार सुधाकर कोहळे, सत्तापक्ष नेता संदीप जोशी, प्रख्यात साहित्यकार आणि मराठी नाट्यलेखक महेश एलकुंचवार, कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, विभागीय आयुक्त अनूप कुमार, महानगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रख्यात उपशास्त्रीय गायिका स्व.गिरीजा देवी व शास्त्रीय गायिका किशोरीताई आमोणकर यांच्या सांगितिक कारकीर्दीवर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. स्व.गिरीजा देवी यांनी यापूर्वीच्या कालिदास महोत्सवात आपल्या गायनाने नागपूर रसिकांची मने जिंकली होती आणि नागपूर व येथील रसिकांशी त्यांचे विशेष ऋणानुबंध असल्याच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. या दोन महान गायिकांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कविकुलगुरु कालिदासांच्या वास्तव्याने पावन झालेल्या रामटेक व नागपूर नगरीत त्यांच्या स्मृतीला उजाळा देणाऱ्या कालिदास महोत्सवात कालिदासांच्याच ऋतुसंहार या कलाकृतीवर आधारित कार्यक्रम सादर होत आहेत ही स्तुत्य बाब आहे. आपल्या देशाला संस्कृत भाषेचा मोठा वारसा लाभला असून कविकुलगुरु कालिदासांच्या विपुल साहित्याचा अभ्यास असणारे अनेकजण या परिसरात आहेत. कालिदास समारोहातील काही कार्यक्रमांचे आयोजन रामटेक येथेही करण्यात येणार असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

महोत्सवाला राष्ट्रीय ओळख निर्माण करणार कालिदास महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा जपतानाच या सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्यासोबतच येथील सर्वंकष पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालिदास महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त दिलेल्या संदेशाद्वारे केले आहे.

कालिदास महोत्सव काही वर्षाच्या खंडानंतर परंपरेच्या पुन्हा अविष्कार या ब्रीद वाक्य घेऊन नागपूर व रामटेक येथे यशस्वीरित्या आयोजित होत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून येथील समृद्ध वारशाकडे लक्ष वेधणे तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर या महोत्सवासोबतच पर्यटन विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी नागपूर महानगरपालिकेसोबतच पर्यटन विकास महामंडळ व कालिदास महोत्सव आयोजन समिती यांनी अत्यंत भव्य पद्धतीने या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

महोत्सवाच्या पहिल्या सत्रात सहा ऋतुंचे सहा सोहळे या संकल्पनेवर आधारित सांगितिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये रेणूका देशकर आणि जैनैद्र सिंह यांनी अभिवाचन केले. यामध्ये वाल्मिक धांडे - संतूर, शिरीष भालेराव - व्हायोलिन, अरविंद उपाध्ये - बासरी, अवनिंद शेवलीकर - सतार तसेच अनिरुद्ध देशपांडे, सायली आचार्य, रेणूका इंदूरकर यांनी शास्त्रीय गायन सादर केले.

महोत्सवात 18 नोव्हेंबर 2017 रोजी मन वृंदावन या कार्यक्रमाअंतर्गत श्रीमती आस्था गोस्वामी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन, ऋतुसंहार - कथ्थक नृत्य नाटिका, गुरु शमा भाटे व नादरुप ग्रुप, पुणे. पं. उदयकुमार मलिक यांचे धृपद धमार गायन सादर होणार आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.