সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 04, 2017

एक कहाणी ध्येयधुंद वेड्यांची!


आमच्या चंद्रपूर शहराकडे समस्त भारतीयांची नजर काहीशा कौतुकानं आणि अधिकतम आश्चर्यानं वळावी असं एक अतर्क्य नुकतंच घडलंय! ते म्हणजे पर्यावरण क्षेत्रात बंडू धोत्रे या ध्येयवादी तरुणाच्या नेतृत्वाखाली आकारानं छोट्या पण सैनिकी शिस्तीत नेटकेपणे वर्षानुवर्षं अखंडपणे काम करणाऱ्या 'इको-प्रो' संस्थेच्या तरुणाच्या चमूनं केलेल्या एका अनोख्या कामानं खुद्द पंतप्रधानांचं लक्ष वेधलं. ते काम म्हणजे या ऐतिहासिक विशाल शहराभोवती असलेला विस्तीर्ण आणि बुलंद परकोट, जो शतकावर काळ दुर्लक्ष झाल्यानं त्यावरच्या तण, रान, घाण, कचरा यांनी विद्रुप झालेला, तो स्वच्छ करून त्याला मूळ खानदानी देखणेपण आणनं! हे काम प्रचंडच नव्हे तर धोक्याचंही होतं. तटाच्या भिंतीतून छोटी झाडं उगवली होती. भिंतींवर अनेक जागी चक्क टन ते तीन फूट मातीचे थर साचले होते. या साठी लागणारी संसाधनं नव्हती. आर्थिक बळ तर नव्हतंच नव्हतं. शिवाय असल्या कामाचा अनुभव कुणालाच नव्हता. पण ध्येयाला वेडाची साथ-संगत मिळाली की अशक्य ते शक्य होतं हा मानवी इतिहास आहे! त्याचाच ताजा पुरावा म्हणून गेले आठ महिने शहरातले वीस पंचवीस तरुण एन पहाटे तटाच्या पायथ्याशी जमतात, आणि अथक काम आटोपून दुपारी घरी परततात. आताशा हे काम जवळपास आटोपत आलेलं असून तटाला जुन्या पैठणीगत गतवैभवाचा काहीसा स्पर्श आल्ल्यागत भास होतोय! 'स्वच्छ भारत' ही घोषणा सार्थ ठरवणाऱ्या या आदर्शवत अद्भुताचा गौरव होणं अपेक्षित असता नेमक्या क्षणी पंतप्रधानांच्या हातची शाबासकीची थाप इको-प्रोच्या पाठीवर पडणं हा एक विलक्षण शुभ योग आहे!

वरील आशादायी घटनेनं मन क्षणभर सुखावत असलं तरी त्या पाठोपाठ मनात कुठेतरी खोलवर एक विलक्षण दुखरी खंत जागते, आणि नजरेसमोर एक जबर प्रश्न नागफणीसारखा उभा होतो. तो म्हणजे स्वातंत्र्य प्राप्त होऊन आज साठावर वर्षं होऊन गेलीत. त्या दरम्यान राजवटी बदलल्या, शासनं बदललीत, अधिकारी बदललेत, नागरिकांच्याही पिढ्या बदलल्यात, मात्र शहराच्या परकोटाची पूर्वापार दुर्दशा आजवर कुणाच्याच नजरेत कशी आणि कां खुपली नसावी? विचारांती जाणवते की एकूण भारतीय मानसिकतेच्या तळाशी एक प्राचीन संन्यस्त उदासीनता गोठून आहे, जी मुळे कुठल्याही अनिष्टाबाबत मनं सहजपणे बधिर, उदासीन, किंवा गावरान भाषेत चक्क बेशरम होतात. मग कुणीतरी ते दूर करावे, वा कुणीतरी ते करेलच असा एक भोळसट खुळा आशावाद मन प्रसवते आणि तत्काळ आळसून बिनधास्त होते! स्वयंप्रेरणेचा असा अभाव मनाला कायम गुलाम करतो. आत्मविश्वास गमावलेली नकारी मनं मग जे हवे ते कुणीतरी करेल याची अनंत काळ वाट बघत स्वस्थ होतात.

वरील संदर्भात दुसऱ्या महायुद्धात पूर्ण सफाया झालेल्या जपानचं उदाहरण देता येईल. तेथे पुनरुत्थानासाठी जागोजागी पुढील भावात्मक संदेशाचे फलक लागले होते. 'जेव्हा तुम्हाला हे कुणीतरी करावे असं वाटेल, तेंव्हा प्रथम ते आपणच का करू नये हा प्रश्न स्वतःला विचारा!' या समाज धारणेतूनच आजचा जपान उभा झालाय. आमच्याकडे असा प्रेरणादायी आत्मविश्वास परंपरेनं रुजवलाच गेला नाही. आम्ही त्याला सोपा बिनकष्टी पर्याय म्हणून अवताराची संकल्पना यशस्वीपणे वापरली. ती म्हणजे अत्याचारानं पृथ्वी गांजली की ती गायीचं रूप घेऊन विष्णूकडे जाते आणि त्याला 'देवा आता अवतार घ्या' हे साकडं घालते, देव मग अवतार घेऊन सारी पापं नष्ट करतो, आणि जग पुन्हा आबादीआबाद होते. याचा ऐतिहासिक मासला आणि दाखला म्हणजे ब्रिटिश राजवटीचं भारतात झालेलं मनःपूर्वक स्वागत! मोगल साम्राज्य नष्ट झाल्यानं पेंढारी आणि लुटारूंनी सर्वत्र माजवलेल्या अराजक आणि अनागोंदीनं त्रस्त झालेल्या लोकांनी स्वयंभू अशा नव्या स्वतंत्र राज्याची निर्मिती न करता स्वतःसोबत कायद्याचे साम्राज्य आणणाऱ्या ब्रिटिशांचं पायघड्या घालून स्वागत केलं. त्या काळी पंचम जॉर्जची तो विष्णूचाच अवतार म्हणून स्वागतगीतं शाळा शाळांतून गायली गेली हे आज कुणालाही खरं वाटणार नाही? थोडक्यात सांगायचं तर या विकृतीतून "ठेविले अनंते तैसेचि राहावे, देवावर भार ठेवोनिया" हे सोयीस्कर पण पलायनवादी अध्यात्म जन्माला आलं. यथावकाश त्यातल्या देवाजागी 'दैव' आलं, आणि त्याही पुढे म्हणजे वर्तमानात त्याचं व्यावहारिक रूपांतर होऊन राजकारणात देवाची जागा पुढारी व नेत्यांनी घेतली, आणि भक्तीची जागा 'निष्ठेनं' घेतली. साहजिक पुढारीही स्वतःला देव मानून कधीही पूर्ण न होणाऱ्या आश्वासनांच्या रूपात लोकांना 'वर' म्हणजे चक्क थापा देऊ लागले. या पार्श्वभूमीवर 'इको-प्रो' नं ओबामासारखे 'होय, आम्ही हे आत्मनिर्भरतेतून करू शकतो' (एस वुई कॅन डू इट!) या भूमिकेतून परकोट सफाईचं प्रचंड आव्हान पेलून ते समर्थपणे पार पाडण्यातून समाजाला एक नवा आणि स्वागतार्ह असा आदर्शात्मक आत्मविश्वास दिलाय म्हणून त्याचं सर्वत्र अनुकरण होणं आज निकडीचं आहे.

तसं सैद्धांतिक दृष्टीने पाहता कुठल्याही राष्ट्रीय समूहाला तेजीनं सर्वांगीण विकास गाठायचा असेल तर जनता आणि शासक यांच्यात उभयपक्षी सहयोग आणि सहकार्य हवंच. जनतेच्या बाजूनं उपक्रमशीलता अपेक्षित असेल तर या सामाजिक सृजनशीलतेला उत्तेजन मिळेल अशी वातावरण निर्मिती करणं, त्याबाबत संतुलित नियोजन करून पुढल्या प्रक्रियेला विधिवत मान्यता देऊन संरक्षण देणं ही शासनाची भूमिका असावी लागते. हे झाल्यास त्याला जनतेच्या बाजूनं उपक्रमी निष्ठा, कष्टाची तयारी, आवश्यक ती पात्रता, आणि समर्पण या बाबींची जोड असायला हवी. यातली कुठलीही एक बाजू लंगडी आणि कमकुवत असली तर विकासात एकारलेपण येईल! दुर्दैवानं भारतात हा ताळमेळ कधी जमलंच नाही. विकासाचा मार्ग शासन आणि आम जनता या दोहोसाठीही अमाप कष्टाचा म्हणून अवघड आहे. या कारणे पुढारी आणि लोक या दोहोना 'मिशन' म्हणून तो गैरसोईचा आहे. म्हणून उभयपक्षी मूकसंमतीनं 'कमिशन' हा सहजशक्य आणि सोपा पर्याय निवडला गेला आहे, आणि यातून भ्रष्टाचार हा शिष्टाचार होऊन बसलाय. यातल्या 'नैतिक स्वच्छता' अभियानासाठी लक्षावधी बंडू धोत्रे लागणार आहेत! ते पैदा करणं ही संपूर्णपणे जनतेची जबाबदारी आहे! उगवत्या पिढीसमोर हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे! पुढल्या सगळ्या पिढ्यांची जबाबदारी याच पिढीवर असल्यानं तिनं सावध आणि सतर्क राहणं फार निकडीचं आहे. त्यासाठी एकूण वर्तमान निष्ठांची तपासणी करून डोळस निष्ठा स्वीकारायला हव्यात. धार्मिक अंधश्रद्धांमुळे आपली किती अधोगती झाली ती आपण बघतोय. तीतून धर्म वाढत चाललेत पण धर्मश्रद्धा मात्र कमी कमी होताना दिसतेय. इकडे धर्माच्या प्रांतात देवळात बडव्यांनी श्रद्धेचा बाजार मांडलाय, आणि तिकडे राजकारणात कार्यकर्ता या गोंडस नावाखाली राजकीय दलालीला उधाण आलंय. तात्पर्य, मतदार राजा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे!

मनोहर सप्रे
9379320746

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.