जिल्ह्यातील उद्योगामुळे इरई नदी दिवसेन दिवस प्रदूषित होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई नदीत विषारी रसायने सोडली जात आहेत. या विषारी रसायनांमुळे नदीच्या पाण्यातील मासे मृत्युमुखी पडले असून, पिण्यासाठी हे पाणी जीवघेणे ठरत आहे. दरम्यान यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पावले उचलली असून चौकशी केल्यावर सदर बाब समोर आली असून उद्योगाला नोटीस बजावणार असल्याचे स्पष्ट संकेत 'एमपीसीबी'ने दिले आहेत.हा संपूर्ण प्रकारसंजीवनी पर्यावरण संस्थेने अध्यक्ष राजेश बेले यांच्या लक्षात येताच त्याची तक्रार 'एमपीसीबीकडे करण्यात आली. चंद्रपूर शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीत मल्टी ऑरगॅनिक्स हा मोठा उद्योग आहे. या उद्योगाच्या जवळूनच एक मोठा नाला वाहतो. हा नाला पुढे चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई नदीला जाऊन मिळतो. या नाल्यानजीक उद्योगातील राख साठविल्या गेल्याचे समोर आले आहे.
- नद्यांना फाटका
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार संजीवनी पर्यावरण संस्थेने पडोली पोलिस ठाण्यात केली आहे. ज्या नाल्यामध्ये हे रसायन सोडले जाते, तो नाला इरई नदीला मिळतो आणि इरई नदी पुढे जाऊन वर्धा नदीला मिळते. त्यामुळे दोन नद्या या प्रकारामुळे प्रदूषित होत आहेत. इरई आणि वर्धा नदीवर अनेक पेयजल योजना अस्तित्वात आहेत. त्यामुळे नद्यांना नाहक झळ सहन करावी लागत आहे.