वीजबील भरणा दिनांक वाढवणार
नागपूर , दि. १२ सप्टेंबर २०१८ :-
महावितरणच्या मुंबई मुख्यालयातील मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे विस्कळित झालेली महावितरणची ऑनलाईन वीजबील भरणा सेवा आज दि. १२ सप्टेंबर २०१८ पासून सुरळीत झाली आहे. दरम्यान या कालावधीत ज्या ग्राहकांसाठी तत्पर देय दिनांक (Prompt Payment) किंवा अंतिम देय भरणा दिनांक (Due Date) ची मुदत संपली आहे. अशा ग्राहकांसाठी मुदत वाढविण्यात येणार आहे.
महावितरणच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दि. ०८ सप्टेंबर २०१८ पासून ग्राहकांना ऑनलाईन वीजबील भरणा करण्यात अडचणी येत होत्या. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून वीजग्राहकांना नेहमीप्रमाणे महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in, मोबाईल ॲप व इतर ऑनलाईन सेवाद्वारे वीजबील भरता येईल. सर्व्हर बंद असल्याच्या काळात ज्या ग्राहकांची गैरसोय झाली आहे, त्याबाबत महावितरणने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच सर्व्हर बंदच्या काळात ज्या वीजग्राहकांना वीजबील भरता आले नाही त्यांची देय दिनांक वाढविण्यात येणार आहे.