तरुणाईसाठी स्वरवैदर्भी सिनेगीत गायन स्पर्धा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवानिमित्त 'स्वरवैदर्भी' विदर्भस्तरीय सिनेगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेची निवड फेरी दि. ८ सप्टेंबर रोजी सावंगी मेघे, वर्धा येथे होणार असून या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५४ हजार रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येतील.
स्वरवैदर्भीचे हे पंधरावे वर्ष असून पार्श्वगायिका वैशाली भैसने माडे, धनश्री देशपांडे, रसिका चाटी, अभिषेक मारोटकर, श्रुती जैन, गौरी बोधनकर, कैवल्य केजकर, रसिका व कृतिका बोरकर आदी अनेक सुपरिचित गायक-गायिकांनी यापूर्वी ही स्पर्धा गाजविली आहे. यावर्षी १७ ते ३५ या युवागटासाठी ही गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम २२ हजार, व्दितीय ११ हजार तर तृतीय ७ हजार रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येतील. याशिवाय, प्रत्येकी दोन हजार रुपयांचे एकूण ७ प्रोत्साहन पुरस्कारही देण्यात येणार आहेत. स्पर्धेकरिता प्रवेश शुल्क केवळ १०० रुपये असून प्रवेश शुल्काची संपूर्ण रक्कम सावंगी रुग्णालयाच्या रुग्ण सहाय्यता निधीला देण्यात येईल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाने दि. ६ सप्टेंबरपर्यंत प्रवेशपत्र भरावयाचे आहे. प्रवेशपत्रासोबत वयाचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. निवडफेरी दि. ८ रोजी सकाळी १० वाजता सावंगी मेघे येथील आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या दत्ता मेघे सभागृहात घेण्यात येईल. या फेरीत स्पर्धकांना सन २००० पूर्वी प्रदर्शित हिंदी चित्रपटातील गीताचे केवळ धृपद व एक कडवे सादर करावयाचे आहे. या स्वरचाचणी फेरीतून दहा स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. महाअंतिम स्पर्धा शुक्रवार, दि. २१ सप्टेंबरला सांस्कृतिक महोत्सवात घेण्यात येईल.
स्पर्धकांसाठी संवादिनी, तबला व अन्य वाद्यांची व्यवस्था आयोजकांद्वारे करण्यात येणार आहे. सर्वच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांना रोख पुरस्कारासह 'स्वरवैदर्भी' सन्मानचिन्हही प्रदान केले जाईल. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गायकांनी अधिक माहितीसाठी स्वरवैदर्भीचे संयोजक संजय इंगळे तिगावकर (९७६५०४७६७२) किंवा सहसंयोजक सुनील रहाटे (९९२१२८७४०८) यांच्याशी संपर्क साधावा, असे सांस्कृतिक महोत्सवाचे संयोजक डॉ. श्याम भुतडा यांनी कळविले आहे.