ऊर्जा मंत्र्यांचे निर्देश :
वेकोलिने कोळसा पुरवठा वाढवावा. महानिर्मितीने कोळसा रस्ते वाहतूक समस्येचे निरसन करावे. वेकोली, महानिर्मिती व रेल्वेने योग्य समन्वय ठेवावा.
रेल्वेद्वारे कोळसा वाहतुकीतील समस्येवर दिल्ली येथे लवकरच उच्चस्तरीय बैठक
कोराडी/प्रतिनिधी:
वेकोलिने अधिक चांगल्या दर्जाचा कोळसा महानिर्मितीस उपलब्ध करून द्यावा, महानिर्मितीने रस्ते वाहतूक वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, सिंफरने कोळसा नमुना परीक्षण करताना तपासणी पद्धतीत योग्य तो बदल करावा व आगामी काळात महानिर्मिती, वेकोली, रस्ते वाहतूक कंत्राटदार यांनी प्रत्यक्ष खदानस्थळी, अधिक समन्वय ठेवून काम करावे असे निर्देश उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयुक्त बैठकीत दिले.
पावसाळा अंतिम टप्प्यात आहे व आगामी काळातील सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वीज उत्पादन सुरळीत व्हावे तसेच महानिर्मितीच्या वीज उत्पादनासाठी रेल्वे व रस्ते वाहतुकीने वेकोलिच्या विविध कोळसा खाणींतून कोळशाचा पुरवठा आवश्यक त्या मात्रेमध्ये वेळीच उपलब्ध व्हावा या दृष्टीने उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे अध्यक्षतेखाली महानिर्मिती, वेकोली, सिंफर, धारिवाल एनर्जी, आयडियल एनर्जी व कोळसा वाहतूक कंत्राटदार यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन महानिर्मितीच्या ३ X ६६० मेगावाट क्षमतेच्या सभागृहात करण्यात आले.
बैठकीला महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, सल्लागार तथा संचालक(खनिकर्म) श्याम वर्धने, कार्यकारी संचालक राजू बुरडे, प्रदीप शिंगाडे, मुख्य अभियंते अभय हरणे, राजकुमार तासकर, राजेश पाटील, अनंत देवतारे तर वेकोलिचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र, संचालक(कर्मचारीवर्ग) डॉ. संजय कुमार, संचालक (प्रकल्प व नियोजन) टी.एन.झा, संचालक(वित्त) एस.एम. चौधरी, क्षेत्रीय महाव्यवस्थापक गोखले, सिंफरचे डॉ. सिंग, धारिवाल एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक रबी चौधरी, आयडियल एनर्जीचे एस.ओ.देशपांडे तसेच महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा व नागपूर कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
महानदी कोल फिल्ड्स लिमिटेड व साउथ इस्टर्न कोल्फिल्ड्स लिमिटेडच्या खदानीतून रेल्वेद्वारे कोळसा पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही कोल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत कोळसा पुरवठ्यासंबंधी ह्या आठवड्यात सदस्य (वाहतूक) रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली यांच्यासमवेत उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याचे उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
पावसाळ्यात खदानीत पाणी साठल्याने कोळसा उत्पादनावर व पर्यायाने कोळसा पुरवठ्यावर काहीसा परिणाम झाला आहे. वेकोलीच्या विविध खाणींतून आगामी काळात नियमित कोळसा पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे व आगामी काळात महानिर्मितीला अधिकाधिक कोळसा पुरवठा करण्यात येणार असल्याचे राजीव रंजन मिश्र यांनी सांगितले. आयडियल एनर्जी व धारिवाल एनर्जी यांनी मांडलेल्या समस्येचे निरसन करण्यात आले.
बैठकीनंतर महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे व मुख्य अभियंते कोराडी व खापरखेडा यांनी भानेगाव व सिंगोरी खदान येथे तर कार्यकारी संचालक राजू बुरडे यांनी दिनेश,गोकुल व मकरधोकडा खदानस्थळी भेट देऊन कोळसा साठा, रस्ते वाहतूक विषयक समस्या जाणून घेतली व संबंधितांना योग्य ते निर्देश दिले.