चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात लोकमान्य टिळक
अण्णाभाऊ साठे आदरांजली कार्यक्रम
ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दिनाचे औचित्य साधत चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात एका आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या मंचावर चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम , चंद्रपूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडूभाऊ लडके , जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके , चंद्रपूर पोलिसांच्या सायबर सेलचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून झाला. मान्यवरांचे पुस्तक भेट देत स्वागत करण्यात आले. पत्रकार संघाचे सचिव प्रशांत विघ्नेश्वर यानी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने घेतल्या जाणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली. आपल्या संबोधनातून चंद्रपूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडूभाऊ लडके यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने आजच्या दिवसाचे औचित्य साधून जिल्हाभरातील पत्रकारांसाठी 'फेक न्यूज ' आणि 'सायबर क्राईम ' विषयावर आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्यांनी पत्रकार संघाच्या एकीच्या बळाचे विशेष कौतुक केले.
आपल्या संवादातून चंद्रपूर पोलिसांच्या सायबर सेलचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यानी 'सायबर क्राईम ' विषयावर विविध उदाहरणे देत मार्गदर्शन केले. एटीएम सुरक्षा, सोशल मीडियावर सजगता , आपल्या वैयक्तिक माहिती संदर्भातील काळजी याबाबत त्यांनी खास टिप्स दिल्या. सावधानता बाळगूनही काही विपरीत घडल्यास करावयाच्या उपायांची माहिती पो. उ. नि. मुंडे यांनी दिली.
आपल्या प्रमुख संबोधनातून जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी राज्य सध्या 'फेक न्यूज' च्या विळख्यात असून पत्रकार म्हणून माध्यम प्रतिनिधींनी पार पाडावयाच्या जबाबदारीची विशेष गरज असल्याचे सांगितले. मुद्रित असो वा इलेकट्रोनिक अथवा पोर्टल सर्वांनी बातमीची खातरजमा केल्याशिवाय ती लोकांपर्यंत जाणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्याने केले. व्हॉटसप , फेसबुक, युट्युब , ट्विटर , इंस्टाग्राम यांचा वापर सुशिक्षित होण्यासाठी करा. सध्या समाज माध्यमांवर दुर्जन अधिक सक्रिय असून सज्जन हतबल असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. खोट्या बातम्या टाळा आणि समाजातील शांतता कायम ठेवण्यासाठी योगदान द्या असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी 'फेक न्यूज ' संदर्भात केलेल्या भाषणाची चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम यांनी आदरांजली कार्यक्रम आणि कार्यशाळा उपक्रमाला उपस्थित सर्व पत्रकार संघटना सदस्यांचे अभिनंदन केले. सज्जनशक्ती सक्रिय झाल्यानेच समाजातील वैरत्व-दुही नष्ट होईल अशी भूमिका तुमराम यांनी मांडली. आज पत्रकारितेवर मोठी जबाबदारी आहे आपण सर्व मिळून ती पार पडण्याची गरज असल्याचे त्यांनी अध्यक्षीय भाषणातून नमूद केले. कार्यक्रमाचे संचालन चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे सचिव प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले. या कार्यक्रमाला चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ , चंद्रपूर मराठी पत्रकार संघ , महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ आदी पत्रकार संघटनाच्या सभासदांची भरगच्च उपस्थिती होती.