नागपूर/प्रतिनिधी:
महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात नेतृत्व विकास कार्यक्रमा अंतर्गत “वैयक्तिक व संस्थेच्या विकासात उत्साहाची भूमिका” या विषयावर नागपुरातील सुप्रसिद्ध प्रेरणादायी प्रशिक्षक अमोल मोर्या यांनी मार्गदर्शन केले. खापरखेडा प्रशिक्षण उप केंद्रामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील, उप मुख्य अभियंते मनोहर खांडेकर, राजेंद्र राउत आणि प्रशिक्षक अमोल मौर्या प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
औष्णिक वीज उत्पादनाचे कार्य अतिशय खडतर व क्लिष्ठ स्वरूपाचे असल्याने हे काम यशस्वीरीत्या हाताळण्याकरीता विभाग प्रमुखांमध्ये अधिकाधिक नेतृत्वगुण विकसित होणे काळाची गरज असल्याचे राजेश पाटील मुख्य अभियंता यांनी प्रतिपादन केले.
प्रशिक्षक अमोल मौर्या यांनी आयुष्य बदलवून टाकणाऱ्या काही गोष्टी सांगितल्या. आपल्यातील देव म्हणजे उत्साह,आपण जे काही काम करतो त्याचा आनंद मिळाला पाहिजे, वयाच्या ५५ व्या वर्षानंतर म्हातारपण आल्याचे जाणवते तर अमिताभ बच्चन सारखा अभिनेता/कलाकार वयाच्या ७५ व्या वर्षी देखील तरुणाला लाजवेल असे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कुठलेही काम करतांना त्यात सात्विकता, निष्ठा, आपलेपण असायला हवे, आपल्या कामाचा दुसऱ्यावर विश्वास बसायला हवा, आपले ध्येय व संस्थेचे ध्येय यामध्ये उत्तम मिलाफ व्हायला हवा, शिकण्याची उर्मी कायम ठेवा, सतत प्रयत्नरत रहा, परिश्रमाची तयारी ठेवा, संधी शोधा, जबाबदारी घ्या व आपल्या कामाप्रती विनम्रता ठेवायला हवी असे अमोल मौर्या यांनी सांगितले.
पैसा, शक्ती आणि प्रभाव यापेक्षाही “उत्साह” अधिक परिणामकारक आहे. कुठलीही गोष्ठ मनावर घेतली कि उत्साह निर्माण होतो. उत्साहामध्ये आवडीची भर पडली तर यश नक्कीच पदरी पडते. समारोपा प्रसंगी प्रशिक्षणाबाबत सहाय्यक महाव्यवस्थापक(मानव संसाधन) नंदकिशोर पांडे यांनी गौरवोद्गार काढले. प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन स्नेहा लालमुंडे यांनी केले.
प्रशिक्षणाच्या प्रथम टप्प्यात विभाग प्रमुखांसाठी व्यक्तिमत्व विकासात्मक प्रशिक्षणाची शृंखला खापरखेडा प्रशिक्षण उप केंद्राद्वारे घेण्यात येत असून यामध्ये दर पंधरा दिवसांनी एक तज्ज्ञ प्रशिक्षक आपले बहुमुल्य विचारपुष्प गुंफणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त प्रशिक्षणपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सहभागी प्रशिक्षणार्थीमध्ये अधीक्षक अभियंते विलास मोटघरे, शरद भगत,सुनील रामटेके, प्रकाश बंडावार, भरत भगत, परमानंद रंगारी, जितेंद्र टेंभरे, अर्जुन वानखेडे तसेच विभाग प्रमुख इत्यादींचा सहभाग होता. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विजय अढाउ व चमूचे मोलाचे सहकार्य लाभले.